आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रात सत्तेसाठी पोरखेळ सुरू असून सरकार अस्तित्वात नाही. एक मुख्यमंत्री आहे, तर दुसरा बिनखात्याचा मंत्री आहे. निर्णय घ्यायला कुणीही नाही. हे राज्य सरकार उर्वरित अडीच वर्षे चालेल असे अजिबात वाटत नाही. कार्यकर्त्यांनी एक ते दीड वर्षात निवडणुकीसाठी तयार राहावे. भाजपच्या नेत्यांनीच ओबीसी आरक्षण मिळू दिले नाही, आता ढोल कशाचे वाजवत आहात? अशा शब्दात माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.
रविवारी मुक्ताईनगर येथील खडसे फार्म हाऊसवर राष्ट्रवादी काँग्रेसचा विधानसभा क्षेत्राचा मेळावा झाला. त्यात खडसे म्हणाले की, राज्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. मात्र, जनतेकडे लक्ष द्यायला सरकारकडे प्रतिनिधी नाही. शिंदे गटातील आमदार चंद्रकांत पाटील यांचा नामोल्लेख टाळून खडसेंनी मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात देखील उच्चशिक्षित व सज्जन आमदार मतदार संघात आलेला विकासाचा निधी परत नेतात, कामांवर स्थगिती आणतात.
केवळ आपण मराठा समाजाला मुक्ताईनगरात एक एकर जमीन दिल्याने आमदारांनी तेथे समाज मंदिर बांधले नाही, असा आरोप केला. ‘राज्यपालांचे कौतुक करावे तेवढं कमीच आहे’ अशी खोचक टिपणी देखील केली. यानंतर जि.प., पं.स. निवडणूक पूर्वतयारीची माहिती घेतली. पक्ष सदस्य नोंदणीचा आढावा घेताना केवळ सभासद पावत्या जमा करणे म्हणजे काम करणे नव्हे. प्रत्यक्ष कार्यकर्ते उभे करा, अशा कानपिचक्या पदाधिकाऱ्यांना दिल्या. पक्ष निरीक्षक अविनाश आदिक, जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील, जिल्हा बँक संचालिका अॅड.रोहिणी खडसे खेवलकर, जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन माजी सभापती विलास धायडे, तर आभार विनोद तराळ यांनी मानले.
सुसंवाद यात्रा काढणार : अॅड.खडसे
रोहिणी खडसे-खेवलकर म्हणाल्या की, येत्या स्वातंत्र्य दिनापासून राऊतझिरा (ता.बोदवड) येथृून राष्ट्रवादी सुसंवाद यात्रेला सुरुवात करू. २६ नोव्हेंबरला मुक्ताई मंदिर येथे यात्रेचा समारोप होईल. यात्रेत मुक्ताईनगर मतदार संघातील प्रत्येक गाव पिंजून काढू. आगामी काळात स्वावलंबी गाव योजना राबवू असे सांगितले.
संघटना वाढीवर भर द्या : आदिक
निरीक्षक अविनाश नाईक-आदिक यांनी पक्ष संघटना वाढीसाठी असलेल्या बाबी कार्यकर्त्यांमध्ये रुजवण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचे आवाहन केले. सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आतापासूनच निवडणुकांसाठी कामाला लागावे. एकजुटीने काम करावे, असे आवाहन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.