आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोलमाल:खरेदी-विक्रीच्या 14 व्यवहारांवरही संशय, नायब तहसीलदारास कोठडी

भुसावळ14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तहसीलदारांच्या बनावट आदेशाने पतसंस्थेचे प्लॉट विक्री प्रकरणात नायब तहसीलदार शशिकांत इंगळे व लिपिक शाम तिवारी यांना सोमवारी न्यायालयाने ४ ऑगस्टपर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. याच पद्धतीने म्हणजेच तहसीलदारांची बनावट स्वाक्षरी व शिक्क्यांचा वापर करून झालेले जमीन विक्रीचे १४ व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात आहेत. जमिनीचे विभाजन न करता अशा पद्धतीने प्लॉट विक्रीचे इतरही काही व्यवहार समोर येऊ शकतात. त्यादृष्टीने तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

शहरातील जनकल्याण अर्बन पतसंस्थेचे विशेष वसुली अधिकारी रवींद्र धांडे यांनी तहसीलदारांची बनावट सही व शिक्के वापरून संस्थेचे प्लॉट विक्री केले. हे प्लॉट घेणारे १० जण आणि वसुली अधिकारी धांडे अशा ११ जणांवर भुसावळ शहर पोलिस ठाण्यात १७ जुलैला गुन्हा दाखल झाला होता. मुख्य आरोपी रवींद्र धांडे यास अटक झाली. यानंतर पोलिसांनी रविवारी दुपारी भुसावळचे नायब तहसीलदार शशिकांत इंगळे व लिपिक शाम तिवारी यांना अटक केली. या दोघांना सोमवारी भुसावळ अतिरिक्त सत्र न्यायालयात न्यायाधीश जंगम स्वामी यांनी ४ ऑगस्टपर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या पद्धतीची अजून १४ प्रकरणे रडारवर असल्याने पोलिस कसून चौकशी करत आहे.

तपासात अनेक बाबींचा उलगडा
नायब तहसीलदार शशिकांत इंगळे व लिपिक शाम तिवारी यांना न्यायालयाने सोमवारी तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या तपासात अशा पद्धतीने किती जणांना बनावट आदेश दिले? संशयितांची त्यात असलेली भूमिका? अशा अनेक मुद्द्यांचा उलगडा होऊ शकतो. संशयितांतर्फे अ‍ॅड.जगदीश कापडे, तर सरकारतर्फे अ‍ॅड.अनिल चुकेवाढ यांनी काम पाहिले. तपास शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अंबादास पाथरवट करत आहेत.

मोठे मासे लागतील गळाला?
या प्रकरणात सुरुवातीला जनकल्याण अर्बनचा वसुली अधिकारी व आता नायब तहसीलदार, लिपिक यांचा सहभाग समोर आला. दुसरीकडे याच पद्धतीने इतरही अनेक प्रकरणात बनावट आदेश तयार करून व्यवहार झाल्याचा पोलिसांना संशय आहे. तसेच शहरातील राजकीय व रिअल इस्टेट क्षेत्रातील एक बडी हस्ती व त्याच्या भावाने करामती केल्याची प्रशासनात चर्चा आहे.

व्यवहारांची तपासणी करणार
साक्षीदारांच्या जबाबानंतर अशा पद्धतीने १४ व्यवहार झाल्याची माहिती पुढे आली आहे. या व्यवहारांमध्ये अनियमितता आहे की हे व्यवहार कायदेशीर आहेत? याचा तपास सुरू आहे. त्यात दोषी आढळणारा कुणीही असो त्याच्यावर कारवाई होईलच.
सोमनाथ वाघचौरे, डीवायएसपी, भुसावळ

बातम्या आणखी आहेत...