आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअवघ्या २१ दिवसांपूर्वी मोठ्या थाटामाटात विवाह झालेल्या नववधूच्या लग्नाची हळद सुकण्यापूर्वीच तिचा ‘ब्रेन हॅमरेज’ने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शहरात वाणी गल्लीत घडली. या घटनेमुळे विवाहितेचे कुटुंब पुरते हादरले आहे. तर पती अंकुश सावदेकर यांचे भावी जीवनातील सुखी संसाराचे स्वप्न मात्र पत्नीच्या मृत्यूने भंगले.
येथील वाणी गल्लीतील रहिवासी अंकुश सावदेकर यांचा १७ एप्रिलला नशिराबाद येथील दिलीप वाणी यांची कन्या गौरीशी मोठ्या थाटामाटात विवाह पार पडला विवाहानंतर नवदाम्पत्य वणीच्या देवीच्या दर्शनाला गेले होते. मात्र ३० एप्रिलला गौरीला ‘ब्रेन हॅमरेज’ झाल्याने मेंदूत रक्तस्त्राव झाला होता. यात तिचा एक हात व पाय निकामी झाला. सुरुवातीला जळगाव येथे तर नंतर मुंबईतील नायर हॉस्पिटलमध्ये तिच्यावर शर्थीचे उपचार करण्यात आले. मात्र गुरुवारी मध्यरात्री तिची प्राणज्योत मावळली.
अंकुशचे प्रयत्न अयशस्वी; सुखी संसाराचे स्वप्न भंगले एक महिन्यापूर्वी यावल येथील न्यायालयात लिपिक पदावर नोकरीला लागलेल्या अंकुशची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. वडील त्याच्या लहानपणीच वारले आहेत तर आई अंगणवाडी सेविका म्हणून काम करते. १७ एप्रिल रोजी लग्न झालेल्या अंकुश व गौरी यांनी पाहिलेल्या सुखी संसाराला सुरुवात होण्यापूर्वीच डाव अर्ध्यावरती मोडला आहे, असेच म्हणावे लागेल.
पत्नीला वाचवताना अंकुशचे प्रयत्न नियतीपुढे अखेर फोल ठरले. आर्थिक परिस्थिती नसलेल्या अंकुशच्या पाठीशी मित्र परिवार उभा राहिला. मित्रांसह दात्यांनी आर्थिक मदतही पत्नीच्या उपचारासाठी अंकुशला दिली. मात्र लग्नानंतर अवघ्या २१ दिवसांत पत्नीच्या मृत्यूच्या घटनेने समाजमन हळहळले आहे. मृत विवाहिता गौरीवर शुक्रवारी रात्री येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.