आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाणादाण:बसस्थानक बनले तळे; प्रमुख मार्गांवर साचले पावसाचे पाणी ; शहरात किरकोळ पावसामुळेही जनतेचे हाल

भुसावळ9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात शुक्रवारी रात्री समाधानकारक पावसाने हजेरी लावली. अर्ध्या तासात १९.२ मिमी पावसाची नोंद झाली. पहिल्याच पावसाने शहराची दाणादाण उडाली. त्यामु‌ळे बस स्थानकाला तळ्याचे स्वरुप आले. यामुळे बसमधून चढउतर करताना प्रवाशांना डबक्यातून मार्गक्रमण करावे लागले. तर शहरातील विविध भागांमध्ये दुसऱ्या दिवशी शनिवारी दुपारपर्यंत पावसाच्या पाण्याचा निचरा झाला नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. शहरात शुक्रवारी रात्री सव्वादहाच्या दरम्यान अर्धातास समाधानकारक पाऊस झाला. यापूर्वी दोनवेळा झालेल्या पावसाच्या तुलनेत शुक्रवारी अधिक अर्थात १९.२ मिमी पावसाची नोंद झाली. पहिल्याच पावसाने मात्र शहरात दाणादाण उडवली. रेल्वे स्थानकाजवळ असल्याने भुसावळ शहरातील बसस्थानकाला अधिक महत्त्व आहे. यामुळे बसस्थानकात वर्दळ कायम असते. बसस्थानकाच्या बाहेरील रस्त्याचे डांबरीकरण झाल्याने रस्ता उंच झाला. यामुळे बसस्थानकातील पाण्याचा निचराच होत नसल्याने बसस्थानकात शनिवारी दुपारपर्यंत तळे साचले होते. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. शहरात प्रमुख मार्गांवर साचलेले पावसाचे पाणी शनिवारी सकाळपर्यंत रस्त्यावर पाणी साचून होते. गटारी, नालेसफाईचा दावा फोल : शहरात बलबलकाशी या प्रमुख नाल्यासह सात नाले आहेत. या नाल्यांची तसेच यावलरोड, जामनेररोड, खडकारोड, जळगावरोड या प्रमुख मार्गांवरील गटारींचीही पालिकेतर्फे मान्सूनपूर्व स्वच्छता करण्यात आली. मात्र पहिल्याच पावसात रस्त्यांवर पावसाचे पाणी साचले. यामुळे पालिकेचे गटारी व नालेसफाईचा दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

रस्त्यांचा उतार योग्य नसल्याने गैरसोय ^पालिकेने वर्षभरापासून नालेसफाई केली. यामुळे पावसानंतर पाणी साचण्याचे प्रमाण यापूर्वीच्या तुलनेत कमी आहे. लोखंडी बोगद्यात रेल्वेकडून योग्य ड्रेनेज व्यवस्था नसल्याने पाणी साचते. इतर ज्या भागात पाणी साचले तेथे रस्त्यांचा उतार योग्य नसल्याने ही स्थिती निर्माण झाली. आम्ही पाणी कुठे साचले याची माहिती घेतली असून यापुढील पावसात ही स्थिती निर्माण होऊ नये, म्हणून प्रयत्न करू. प्रदीप पवार, प्रभारी आरोग्य अधिकारी, भुसावळ पालिका

--------------------------------------

बातम्या आणखी आहेत...