आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनास्था:केळीच्या नुकसानीची भरपाई विमा कंपनीने तातडीने शेतकऱ्यांना द्यावी; आमदार शिरीष चौधरींनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन केली मागणी

रावेर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रावेर, यावल मतदारसंघात जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात तीन वेळा चक्रीवादळाचा फटका शेतकऱ्यांना बसला. केळी पिकाची अपरिमित हानी झाली आहे. त्यामुळे विमा कंपनीकडून त्वरित भरपाई मिळावी, अशी मागणी आमदार शिरीष चौधरी यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेऊन दिलेल्या निवेदनात केली आहे.

साधारणतः दरवर्षीच शेतकऱ्यांना अशा संकटांचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांनी हिंदुस्थान अॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी व बजाज अलायन्झ कंपनी या दोन कंपन्यांच्या माध्यमातून पिकाचा विमा उतरवला आहे. विमा कंपनीने कृषी, महसूल विभाग व ग्रामपंचायत यांचा संयुक्त स्वाक्षरीने पंचनामा करणे व ऑनलाइन तक्रार करणे किंवा टोल फ्री नंबरवर तक्रार नोंदवणे, हवामान मापक केंद्राची नोंद, नुकसानाची पूर्व सूचना, नुकसानीच्या ७२ तासाचा आत अॅपवर नोंदणी आवश्यक असणे असे ४ पर्याय असतानाही विमा कंपनीचे प्रतिनिधी फक्त ऑनलाइन केलेली तक्रारच ग्राह्य धरली जाईल, असे सांगून शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत.

तसेच मागील वेळेस नुकसानीची २० टक्के रक्कम कमी दिल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. कंपनीच्या प्रतिनिधीकडून, दलालांकडून शेतकऱ्यांकडे आर्थिक मागणी केली जात आहे. ज्या शेतकऱ्यांनी आर्थिक मागणी पूर्ण केली त्याच शेतकऱ्यांचे विमे मंजूर होत असल्याचा तक्रारी आहेत. अशाप्रकारे विमा कंपनीचे प्रतिनिधी किंवा काम करणारे दलाल शेतकऱ्यांची एकप्रकारे लूटच करत आहे. विमा कंपन्यांच्या अशा प्रतिनिधी तसेच दलालांवर कठोर कारवाई करावी. लोकप्रतिनिधी, विमा कंपनी प्रतिनिधी, शेतकरी प्रतिनिधी व प्रशासन अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याबाबत कार्यवाही करण्याची मागणी आमदार चौधरींनी केली.

बातम्या आणखी आहेत...