आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपहार:व्यवस्थापकाने लांबवले मणप्पुरमचे 1 कोटीचे साेने!

भुसावळ8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्षभरापूर्वी उत्तर प्रदेशातील मणप्पुरम फायनान्स लिमिटेडमध्ये १० लाखांचा अपहार करणाऱ्या व्यवस्थापकाला शिक्षा म्हणून दोन महिन्यांपूर्वी भुसावळला नियुक्तीवर पाठवले होते. मात्र, येथे आल्यावर त्याने बँकेतून १ काेटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे तब्बल २ किलाे ६० ग्रॅम वजनाचे साेने लांबवल्याची घटना २२ नोव्हेंबरला सकाळी उघडकीस आली. ही चोरी रविवारी (दि.२०) सकाळी ८.२१ ते ८.३५ या वेळात घडल्याचा कयास आहे. चोरीपूर्वी नियोजनबद्ध पद्धतीने शनिवारी रात्रीच बँकेतील सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून ठेवले होते.

शहरातील जामनेर राेडवरील पांडुरंग टाॅकीजजवळ मणप्पूरम फायनान्स लि. चे कार्यालय आहे. या बँकेचे शहरात २१०० ग्राहक आहेत. तेथून एक कोटी रुपये किमतीचे २ किलाे ६० ग्रॅम वजनाचे दागिने बँक व्यवस्थापक विशाल राय (वय ३०, रा. उत्तर प्रदेश) याने लांबवल्याची तक्रार आहे. रविवारी सकाळी ८.२१ ते ८.३५ वाजेदरम्यान म्हणजे केवळ १४ मिनिटांत ही चोरी झाल्याचे मंगळवारी सकाळी उघडकीस आले. संशय असलेल्या राय याची दोन महिन्यांपूर्वी भुसावळात व्यवस्थापकपदी नियुक्ती झाली होती. त्यामुळे बँक व तिजोरीची चावी त्याच्याकडेच असायची. त्याने २० नोव्हेंबर या रविवारच्या सुटीच्या दिवशी सकाळी ८.२१ वाजता बँक उघडली. यानंतर १४ मिनिटांत तिजोरीतील २ किलो ६० ग्रॅम वजनाचे दागिने घेऊन ८.३५ वाजता बाहेर पडला. याप्रकरणी मंगळवारी बँकेची तक्रार येताच डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, एपीआय सुदर्शन वाघमारे हे पथकासह घटनास्थळी आले. पोलिसांनी बँक असलेल्या इमारतीमधील एका कार्यालयाबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजची पाहणी केली. त्यात राय हा रविवारी सकाळी ८.२१ वाजता येऊन ८.३५ वाजता परत गेल्याचे दिसले.

ऑडिटनंतर चोरीची पुष्टी सोमवारी सकाळी बँकेचे इतर कर्मचारी नेहमीप्रमाणे कामावर आले. मात्र, शटरला कुलूप नसल्याने संशय बळावला. यानंतर त्यांनी ऑडिटरला बोलावणे केले. त्यात बँकेने दिलेल्या कर्जाची पडताळणी व ग्राहकांनी तारण म्हणून ठेवलेल्या सोन्याची मोजणी केली. या बँकेत तारण ठेवलेल्या एकुण २२ किलोपैकी २ किलो ६० ग्रॅम वजनाचे सोने कमी भरले. त्यातच व्यवस्थापक विशाल राय हा बँकेकडे फिरकला नाही. त्यामुळे चोरीचा संशय बळावून बँक प्रशासनाने मंगळवारी सकाळी बाजारपेठ पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला.

चावी ठेवली कूलरवर मणप्पूरम फायनान्सच्या कार्यालयात दोन लॉकर आहेत. त्यापैकी व्यवस्थापक राय याने एका लॉकरमधील सोने काढून नेले. दुसऱ्या लॉकरमधील सोने व रोकड तशीच पडून होती. चाेरीनंतर राय याने बँकेची चावी तेथे असलेल्या कुलरवर ठेवली. यानंतर बँकेचे शटर खाली टाकून तो निघून गेला. दरम्यान, रविवारी सकाळी ७.३५ वाजता बँकेतील एका कर्मचाऱ्याने रायला मोबाइलवर कॉल केला होता, मात्र त्याने प्रतिसाद दिला नाही. तेव्हापासून त्याचा माेबाइल स्वीच अाॅफ झाल्याचे समोर आले.

बातम्या आणखी आहेत...