आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘राष्ट्रवादी’त गटबाजी:जिल्हाध्यक्षांनी घेतलेल्या बैठकीला माजी मंत्री खडसे गटाने मारली दांडी

भुसावळ8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन बांधणीसाठी मंगळवारी माजी आमदार संतोष चौधरी यांच्या शनि मंदिर वॉर्डातील कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली. मात्र, आमदार तथा माजी मंत्री एकनाथ खडसे समर्थक माजी नगरसेवक, पदाधिकारी या बैठकीकडे फिरकले नाहीत. संघटना बांधणी असलेल्या या बैठकीतच खडसे-चौधरी अशी गटबाजी अधिक ठळकपणे समोर आली.

राष्ट्रवादी काँग्रेसची सदस्य नोंदणी, निवडणुकीची आढावा बैठक मंगळवारी झाली. जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, आजी आमदार संतोष चौधरी, उल्हास पगारे, सचिन चौधरी, तालुकाध्यक्ष दीपक मराठे, शहराध्यक्ष नितीन धांडे व पदाधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे माजी आमदार चौधरींच्या गटाचे सर्व पदाधिकारी बैठकीला हजर असताना माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादीत आलेले माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांपैकी कुणीही उपस्थित नव्हते. जिल्हाध्यक्षांच्या बैठकीला खडसे समर्थकांनी दांडी मारल्याने भुसावळ राष्ट्रवादीतील गटबाजी पुन्हा उघड झाली. दरम्यान, या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील उमेदवारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नेते अजित पवार, माजी मंत्री एकनाथ खडसे, माजी आमदार संतोष चौधरी या नेत्यांच्या सल्ल्याने देण्यात येईल. आगामी काळात भुसावळातील आमदार देखील राष्ट्रवादीचा निवडून आणू असे जिल्हाध्यक्ष पाटील यांनी सांगितले.

इच्छुकांना ५ ऑगस्टपर्यंत भरून देता येतील अर्ज
पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुकांना तालुकाध्यक्ष दीपक मराठे व पालिकेसाठी इच्छुकांनी शहराध्यक्ष नितीन धांडे यांच्याकडे पक्षाचे अर्ज मिळतील. हे अर्ज दोघांकडे ५ ऑगस्टपर्यंत जमा करावे. सक्रिय सदस्यांची नोंदणी वाढवावी, असे आवाहन जिल्हाध्यक्ष पाटील व माजी आमदार चौधरींनी केले.

एकत्र बैठक लवकरच
बैठकीचे निमंत्रण सर्वांना दिले होते. माजी मंत्री एकनाथ खडसे हे मुंबईला आहेत. ते परत आल्यावर त्यांचे समर्थक व सर्व पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक होणार आहे. मंगळवारच्या बैठकीचे नियोजन जिल्हाध्यक्षांच्या सूचनेनुसार दोन दिवसांत झाले. आमच्यात कोणतेही गट नाहीत.
नितीन धांडे,
शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

नेते नसल्याने अनुपस्थित
आमचे नेते एकनाथ खडसे मुंबईत आहेत. त्यांच्या व जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील यांच्या उपस्थितीत आगामी काळात होणाऱ्या बैठकीला आम्ही उपस्थित राहू. आमचे नेते नसल्याने मंगळवारी उपस्थित नव्हतो. आगामी निवडणुकीत शिवसेना व काँग्रेसला सोबत घ्यायचे किंवा कसे? हा निर्णय घेण्याचा अधिकार नेत्यांना आहे.
प्रा. सुनील नेवे, माजी नगरसेवक

शिवसेना, काँग्रेसला सोबत घेणार : संतोष चौधरी
निवडणुकीत पालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस व लहान पक्षांना सोबत घेऊ अशी घोषणा माजी मंत्री संतोष चौधरी यांनी बैठकीत केली. सर्वांनी पक्षासाठी एकत्रित कामे करावे, असे आवाहन देखील केले.

बातम्या आणखी आहेत...