आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुविधा:अस्वच्छता, सांडपाण्याचा प्रश्न सुटेल; 300 कोटी रुपये खर्चातून शहरात भूमिगत गटारी

भुसावळ9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुंबलेल्या गटारी, त्यातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे वैतागलेल्या भुसावळकरांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण आता संपूर्ण शहरात भूमिगत गटारी होणार आहे. या कामासाठी मे महिन्यात नागपूर येथील एका कंपनीकडून सर्वेक्षण करण्यात आले होते. सुमारे ३०० कोटी रूपये खर्चाचा हा प्रकल्प आहे. त्यात शहरात भूमिगत गटारी तयार करून मुंबईच्या धर्तीवर त्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्राला दिले जाणार आहे. या योजनेबाबत आमदार संजय सावकारे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सविस्तर चर्चा व पुढील नियोजनाचा आढावा घेतला.

भुसावळ शहरात अस्वच्छतेचा प्रश्न जटील आहे. प्रामुख्याने अनेक भागात मोठमोठ्या गटारी असल्या तरी त्यांची नियमित सफाई होत नाही. शिवाय शहरात बंदी असलेल्या प्लास्टिकचा वारेमाप वापर आहे. या प्लास्टिक कचऱ्यामुळे गटारी, नाले चोकअप होतात. यामुळे सांडपाणी रस्त्यावर येऊन वाट मिळेल तिकडे पसरून जागोजागी तुंबते. तीव्र दुर्गंधी सुटते. यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर होतो. शिवाय पावसाळ्यात सांडपाणी निचऱ्याचा प्रश्न अधिक बिकट होतो. यावर उपाय म्हणून शहरात भूमिगत गटारींची गरज पुढे आली होती. त्या अनुषंगाने मे महिन्यात नागपूर येथील सिन्सिटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने शहरातील गटारी, नाल्यांचे सर्वेक्षण केले. लवकरच या योजनेला मंजुरी मिळेल, अशी शक्यता आहे.

समस्या मार्गी लागेल ^अमृत योजनेच्या फेज २ मध्ये शहरात भूमिगत गटारींची योजना राबवण्यात येईल. केंद्र व राज्य सरकार आणि पालिका त्यासाठी निधी देईल. भूमिगत गटारी झाल्यास सांडपाण्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या सुटतील. संजय सावकारे, आमदार

सप्टेंबरमध्ये तांत्रिक मंजुरी शक्य...या योजनेच्या नियोजनासाठी आमदार संजय सावकारे यांनी नुकतीच अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात नागपूर येथील कंपनीने केलेल्या सर्वेक्षणाचा आढावा घेण्यात आला. मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्यासह नागपूर येथील कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. तेथील चर्चेनुसार ३०० कोटी रूपये खर्चाच्या या प्रकल्पाला सप्टेंबर किंवा आॅक्टाेबरमध्ये तांत्रिक मंजुरी मिळणे शक्य आहे. यानंतर योजनेच्या कामाला खऱ्या अर्थाने गती मिळेल.

बातम्या आणखी आहेत...