आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविशेष रस्ता अनुदानाच्या १२ कोटी रुपये निधीतून होणाऱ्या रस्त्यांना आठ महिन्यांपासून ब्रेक लागला होता. गेल्या पंधरवड्यात ही कामे सुरु झाली. मात्र, केवळ बद्री प्लॉट भाग, मैनाबाई नगर, टेक्निकल हायस्कूल परिसरातील रस्त्यांची कामे झाली. यानंतर झालेल्या पावसामुळे पुन्हा तीन ते चार दिवसांपासून हे कामे बंद पडली आहेत. दरम्यान, ही कामे करताना बीबीएम रस्त्यांवर सिलकोट टाकला गेला. पण, त्यावर पाऊस झाल्याने या रस्त्यांची गुणवत्ता ढासळली आहे. नंतर पावसाळ्यात रस्त्यांचे डांबरीकरण झाल्यास ते कितपत टिकाव धरेल? हा प्रश्न आहे.
पालिकेने १२ कोटींच्या विशेष रस्ता अनुदान योजनेंतर्गत २३ रस्त्यांची कामे मे. विनय सोनू बढे अँड कंपनी या ठेकेदाराला दिले होती. या कामांची मुदत संपल्याने मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी ठेकेदाराला ब्लॅकलिस्टेड केले. हा वाद न्यायालयापर्यंत गेला. यानंतर पालिका व ठेकेदारात तडजोड होऊन आठ महिन्यांपासून रखडलेली कामे गेल्या पंधरवड्यात सुरु झाली.ठेकेदाराने बद्री प्लॉट, मैनाबाईनगर, टेक्निकल हायस्कूल परिसरातील तीन रस्त्यांवर कारपेटचा थर टाकला. ही कामे सुरू असताना पाऊस आल्याने चार दिवसांपासून कामे बंद पडली. आता पावसाचा कालावधी पाहता रस्त्यांची कामे पुन्हा सुरू झाली तरी त्यांची गुणवत्ता किती असेल? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
बाजार वॉर्डात हाल : मुख्य बाजारपेठेतील नृसिंह मंदिर मार्ग, अप्सरा चौक, भास्कर मार्केट, शाळा क्रमांक पाचचा मार्ग या रस्त्यांवर बीबीएम झाले. मात्र, सिलकोट व कारपेटची कामे रखडली आहेत. या भागात व्यापारी वर्गाचा माल हातागड्यांवर आणला जातो. रस्ते उंचसखल असल्याने वाहतुकीसाठी अडचणी येतात. शहराच्या सोयीसाठी या भागातील कामांना गती द्यावी, अशी मागणी व्यापारी, दुकानदार, ग्राहक, हमाल बांधवांनी केली आहे. मिरवणूक मार्ग खडतर : गणेशोत्सवापूर्वी शहरातील मिरवणूक मार्गाचे काम होणे गरजेचे आहे. ब्राह्मण संघापासून थेट स्टेशन रोडपर्यंतच्या मिरवणूक मार्गांवर बीबीएम, सिलकोट, कारपेट झाल्यास दिलासा मिळेल. गेल्या काही वर्षांपासून मिरवणूक मार्गाची दुरवस्था झाल्याने गणरायाच्या विसर्जनासाठी मिरवणुकीतून जाताना भक्तांचे हाल होतात.
या भागात अद्यापही प्रतीक्षा : दत्तनगर परिसर, हुडको कॉलनी, गुंजाळ कॉलनी, देविदास फालक नगर, शुंभराजे नगर, दीनदयाळ नगर, रानातला महादेव मंदिर परिसर, सिंधी कॉलनी भाग, आनंदनगर भाग, गोविंद कॉलनी, बंब कॉलनी, सरोदे हॉस्पिटल भाग, बियाणी हायस्कूल भाग, प्रोफेसर कॉलनी परिसर, मोहंमदी नगर, रॉकेल डेपो भाग, महेश नगर, नाहाटा कॉलेज मागील भाग, विकास कॉलनी, ओम पार्क, गजानन महाराज नगर.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.