आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआराधना कॉलनी-टिंबर मार्केटमध्ये ये-जा करताना रेल्वे रुळ ओलांडावे लागत होते. यामुळे असलेला धोका दूर करण्यासाठी सन २०१८मध्ये रेल्वे रुळांखालून दोन बोगदे तयार करण्याचे ५ कोटी २५ लाख रुपये खर्चाचे काम मंजूर झाले. मात्र, बोगदे तयार करूनही अॅप्रोच रोड व बोगद्याकडे येणाऱ्या पाणी निचऱ्याची व्यवस्था नव्हती. याबाबत ‘दिव्य मराठी’ने प्रसिद्ध केलेल्या बातम्यांची दखल घेऊन बोगद्यांच्या दोन्ही बाजूने काँक्रीटचे अॅप्रोच रस्ते तयार करण्यात आले. यानंतर बोगद्यांचा वापर सुरू झाल्याने दोन्ही बाजूच्या सुमारे १० हजार रहिवाशांचा २ किमीचा फेरा वाचला.
आराधना कॉलनी ते टिंबर मार्केटच्या मधोमध रेल्वे मार्ग गेलेला आहे. परिणामी आराधना कॉलनी, श्रीनगर, अयाेध्या नगर, हुडकाे काॅलनी, रिंगराेड परिसरातून टिंबर मार्केटमधून पुढे शहरातील मुख्य बाजारपेठेत येण्यासाठी रेल्वे रुळ ओलांडावे लागत होते. जळगाव रोड किंवा शॉर्टकटने येणाऱ्या किमान दोन किमी अंतराच्या फेऱ्याने ये-जा करावी लागत होती. त्यातूनच दोन्ही भागांना जोडणाऱ्या बोगद्यांची मागणी पुढे आली.
त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सव्वापाच कोटी रुपये मंजूर केले. रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून २०१९ पासून कामाला सुरूवात झाली. वर्षभरापूर्वी हे बोगदे तयार झाले. पण, त्यास अॅप्रोच रोडचा आणि पाण्याचा निचरा करणाऱ्या व्यवस्थेचा अभाव होता. परिणामी वर्षभर तेथे पाणी, चिखल असल्याने बोगदा असूनही उपयोग नव्हता. नागरिकांना फेऱ्यानेच ये-जा करावी लागत होती. आता ही कामे झाल्याने बोगद्याचा वापर सुरू होऊन फेरा टळला आहे.
या वाहनांना परवानगी
या बोगद्यात दिवे बसवल्याने रात्री देखील तेथून ये-जा करणे शक्य होते. या लहान आकाराच्या बोगद्यातून कार, रिक्षा, माेटरसायकली, पीकअप अशी वाहने धावू शकतात. मात्र, अवजड वाहनांसाठी प्रवेश मनाई आहे.
दंडासह फेरा वाचला
आराधना कॉलनी आणि टिंबर मार्केटमधील रहिवाशांना ये-जा करण्यासाठी रुळ ओलांडावे लागत होते. आरपीएफने पकडल्यास दंड भरावा लागत होता. किंवा जळगाव रोड भागातून फेऱ्याने जावे लागत होते. हा त्रास टळला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.