आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनापासून बचावासाठी आरोग्य विभागाने सुचवलेल्या त्रिसूत्रीमध्ये हात वारंवार सॅनिटायझर, साबण किंवा पाण्याने स्वच्छ धुवावे, अशी सूचना होती. त्यानुसार लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी ही सवय लावून घेतली. आता कोरोना नियंत्रणात असला तरी विद्यार्थ्यांना लागलेली हात धुण्याची सवय कायम राहावी, यासाठी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ५२ शाळांमध्ये हॅण्डवॉश स्टेशन उभारण्यात आले आहे.
भुसावळ पंचायत समितीच्या मान्यतेनुसार तालुक्यातील ६५ शाळांमध्ये विद्यार्थी, शिक्षकांसाठी हॅण्डवॉश स्टेशन उभारणे नियोजित आहे. त्यापैकी ५२ ठिकाणी कामे पूर्ण झाली आहेत. जेवणाचा सुटीत विद्यार्थी डबा खाण्यापूर्वी किंवा शौचालय, लघुशंकेला गेल्यानंतर या स्टेशनवर साबण व पाण्याने हात स्वच्छ धुतात. नंतर वर्गामध्ये प्रवेश करतात. पंचायत समिती सदस्यांच्या निधीतून हे हॅण्डवॉश स्टेशन उभारले आहेत. उर्वरीत १३ शाळांमध्येही लवकरच सुविधा तयार होईल, असे गट शिक्षण अधिकारी किशोर वायकोळे म्हणाले. यापूर्वी शाळांमधील शौचालय दुरुस्तीचा विषय देखील मार्गी लागला आहे.
दिव्य मराठी एक्सपर्ट व्ह्यू
डॉ.खेमचंद्र बोरोले, एमडी, मेडिसीन, भुसावळ
लहान मुले अनेकदा बाहेर, मातीत खेळतात. यामुळे हात अस्वच्छ होतात. त्याच हातांनी जेवण केल्यास आरोग्यविषयक अडचणी येऊ शकतात. त्यात जंतांचे आजार, पोट दुखणे, डायरिया होऊ शकतो.
सामाजिक, कौटुंबीक व वैयक्तिक स्तरावरील आरोग्यविषयक सवयींचा प्रभाव पडतो. केवळ स्वच्छतेसंदर्भात अनुकूल वर्तनातून सुमारे ५४ टक्के सामान्य आजार रोखता येऊ शकतात.
कोविड काळात संसर्ग टाळण्यासाठी हात स्वच्छ असण्याचे महत्त्व सर्वांना कळाले. स्वच्छताविषयक हे वर्तन कायम अनुसरल्यास त्याचा स्वत:चे आरोग्य चांगले राहण्यासाठी उपयोग होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.