आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपस्थितीवर मर्यादा:यंदा पहिल्याच तिथीला उडणार 30 लग्नांचा बार

भुसावळ23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोेना संसर्गामुळे गेली दोन वर्षे विवाह समारंभात वऱ्हाडींच्या उपस्थितीवर मर्यादा होती. यंदा मात्र कोणतेही निर्बंध नाहीत. त्यामुळे तुळशी विवाहानंतरच्या २६ नाेव्हेंबर या पहिल्या तिथीला शहरात सुमारे ३०, तर यंदाच्या संपूर्ण लग्नसराईत ६०० विवाह सोहळे पार पडतील. त्यासाठी गेल्या चार महिन्यांपासून मंगल कार्यालये, लाॅन्स, आचारी, डीजे, भटजी, बग्गी, फुलहार विक्रेत्यांकडे बुकिंग फुल्ल आहे.

लग्नसराईला सुरूवात होताच बाजारपेठेत उलाढाल वाढते. त्यादृष्टीने वेगवेगळ्या व्यावसायिकांनी आधीच तयारी करून ठेवली आहे. वर आणि वधू पक्षाकडून होणाऱ्या मागणीप्रमाणे वस्तूंची उपलब्धता, सेवा देण्यावर भर आहे. दरम्यान, २६ नोव्हेंबर या पहिल्याच लग्न तिथीसाठी शहरातील सर्व लॉन्स, मंगल कार्यालये, हॉलचे बुकिंग झाले आहे. २६ नंतरच्या लग्नतिथींना देखील प्रतिसाद आहे. हॉल, मंगलकार्यालय भाड्याने घेताना यजमानांना हवे त्या पद्धतीचे पॅकेज दिले जाते. त्यात भोजनावळीचा समावेश असेल तर ते थाळीप्रमाणे उपलब्ध केले जाते. त्यातही किती व कोणत्या भाज्या, मिठाई कोणती? यावर दर ठरतात. दरम्यान, यंदा संपूर्ण लग्न सराईत ५७ विवाह मुहूर्त आहेत. मात्र, चैत्र महिन्यात गुरूचा अस्त असल्याने त्यापूर्वी विवाह आटोपण्याकडे यजमानांचा कल आहे.

दोन वर्षांनंतर यंदा प्रथमच डीजेला विचारणा
विवाह साेहळ्यात बहुतेकांचा कल बँड ऐवजी डीजेकडे आहे. एका दिवसासाठी १५ ते ३० हजार रूपयांपर्यत दर आहे. साेबत वाजंत्री असल्यास २५ कामगार असतात. अशावेळी ३० ते ३५ हजार रूपये भाडे आकारले जाते. कोरोनामु‌ळे गेली दाेन डीजेला मागणी नव्हती. सण-उत्सवातील निर्बंधामुळे व्यवसाय ठप्प होते. यंदा लग्न सराईत अनेक ऑर्डर असल्याचे व्यावसायिक किरण काेलते यांनी सांगितले.

बग्गीसाठी लागतात आठ हजार रुपये
नवरदेव, नवरीची मिरवणूक काढण्यासाठी बग्गीची क्रेझ वाढली आहे. भुसावळ शहरात एका विवाहासाठी दोन घोड्यांच्या बग्गीसाठी कमीत कमी ८ हजार रूपये भाडे आकारले जाते. बाहेरगावी जायचे असल्यास अंतरानुसार पैसे वाढतात. नितीन भारंबे, बग्गी व्यावसायिक

हिऱ्याच्या मंगळसूत्राची वाढतेय क्रेझ
विवाह समारंभात दागिन्यांचे आकर्षण असते. यंदा सराफा बाजारात हिऱ्यांचे मंगळसूत्र विक्रीस आले आहे. ५० हजार ते २ लाख रूपयांपर्यत त्याची किंमत आहे. मोजके ग्राहक ते खरेदी करतात. सोन्याच्या वेगवेगळ्या डिझाईनच्या मंगळसूत्रांना देखील मागणी आहे.उज्ज्वल सराफ, सराफा व्यावसायिक

बातम्या आणखी आहेत...