आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळात खळबळ:व्हेंटिलेटरअभावी तीन कोरोना बाधितांनी सोडले प्राण; आरोग्य यंत्रणेचे शर्थीचे प्रयत्न वाया

भुसावळएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • १० व्हेंटी हाताळण्यासाठी ४ एमडी डॉक्टर, १० कर्मचारी हवेत, वरिष्ठांकडे मागणी प्रलंबित
  • डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमधील सर्व ४० बेड फुल्ल, ५ नवीन बेड वाढवण्याचा घेतला निर्णय
  • तालुक्यात आतापर्यंत ५,९४१ बाधित, पैकी ४,८४६ कोरोनामुक्त, तर २१५ रुग्ण दगावले

एकीकडे शासकीय व खासगी दवाखान्यात बेड आणि व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याने अत्यवस्थ कोरोना रुग्णांचा जीव टांगणीला आहे. दुसरीकडे दहा व्हेंटिलेटर उपलब्ध असूनही केवळ तज्ज्ञ डॉक्टर व कुशल मनुष्यबळाअभावी त्यांचा वापर नसल्याने २४ तासांत तीन रुग्णांना जीव गमवावा लागला. भुसावळ ग्रामीण रुग्णालयातील डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये हा दुर्दैवी प्रसंग ओढवला. तेथील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना शर्थीचे प्रयत्न करूनही या रुग्णांचा जीव वाचवता आला नाही. येथील ग्रामीण रुग्णालयातील डेडिकेट काेविड हॉस्पिटलमध्ये केवळ ऑक्सिजनची गरज असलेल्या कोरोना बाधितांना उपचारासाठी दाखल केले जाते. मात्र, कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढणारी संख्या पाहता येथे सध्या एकही बेड शिल्लक नाही. त्यातही दाखल केलेल्या काही रुग्णांवर उपचारासाठी व्हेंटिलेटरची गरज पडते. भुसावळ ग्रामीण रुग्णालयातील डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये सात महिन्यांपासून पीएम केअर फंडातील १० व्हेंटिलेटर उपलब्ध झालेले असले तरी अद्याप त्यांचा वापर सुरू झालेला नाही.

त्यामुळे भुसावळ ग्रामीण रुग्णालयातील अत्यवस्थ रुग्णांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय पाठवले जाते. काही रुग्ण खासगी दवाखान्यात जातात. मात्र, गेल्या आठवड्यापासून जळगावातील सर्व शासकीय, खासगी कोविड हॉस्पिटल हाऊसफुल्ल आहेत. परिणामी हतबल रुग्णांना मिळेल तेथे उपचार घेण्याशिवाय पर्याय नाही. अशा ठिकाणी डॉक्टर व इतर यंत्रणा प्रयत्नांची शर्थ करून कोरोना रुग्णांवर उपचार करते. तरीही व्हेंटिलेटरची गरज असलेल्या रुग्णांचे प्राण वाचवणे अशक्य होत आहे. याच पद्धतीने भुसावळ ग्रामीण रुग्णालयात गेल्या २४ तासात तिघांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. यापैकी बोदवड तालुक्यातील रुग्ण बुधवारी, तर यावल व भुसावळ येथील प्रत्येकी एक असे दोघे गुरुवारी दगावले. यामुळे खळबळ उडाली.

अल्प दिलासा : बाधितांपेक्षा कोरोनामुक्त जास्त; ४७ नवे रुग्ण, ६० जणांना डिस्चार्ज
गुरुवारी भुसावळ शहर आणि तालुक्यात कोरोनाचे नवीन ४७ रुग्ण आढळले. तर दिवसभरात कोरोनामुक्त ६० रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. असे असले तरी दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला. दरम्यान, नवीन ४७ रूग्णांमुळे तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या ५ हजार ९४१ झाली. त्यापैकी ४ हजार ८४६ रूग्णांनी कोरोनाला हरवले आहे. तर आतापर्यंत २१५ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ८८० अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू अाहेत.

असे मनुष्यबळ हवे
ग्रामीण रुग्णालयातील सर्व ४० बेडवर रुग्ण आहेत. त्यामुळे गुरुवारी पाच नवीन बेड वाढवण्यात आले. दरम्यान, मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना ग्रामीण रुग्णालयातील व्हेंटिलेटरचा डेमो पाहिला. मात्र, ही सर्व यंत्रसामग्री हाताळण्यासाठी ४ एमडी डाॅक्टर, १० कर्मचाऱ्यांची मागणी करण्यात आली आहे.

चौकशी अन् प्रयत्न दोन्ही केले, दुर्दैवाने यश आले नाही
अत्यवस्थ दाेन्ही रुग्णांना हलवण्यासाठी आम्ही चौकशी केली. पण जळगाव किंवा इतरत्र कुठेही बेड शिल्लक नव्हते. यामुळे आम्ही दोघांवर भुसावळात शक्य ते उपचार केले. दुर्दैवाने यश आले नाही. लक्षणे दिसताच उपचार घ्यावे. - डाॅ. मयूर चाैधरी, वैद्यकीय अधिकारी, भुसावळ

लसीकरण झाले बंद
गुरुवारी कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी २५० पेक्षा जास्त नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयात गर्दी झाली हाेती. मात्र, अाॅनलाइन नाेंदणीची साइट बंद असल्याने एकही लसीकरण झाले नाही. शहरातील जळगाव राेडवरील अयाेध्या नगर जवळील हुडकाे काॅलनीत माराेती मंदिर परिसरात पालिकेच्या आराेग्य विभागाने कोरोना चाचणी शिबिर घेतले.

येथील आहेत मृत रुग्ण
कोविड हॉस्पिटलमध्ये गुरुवारी पहाटेच दाेन काेराेना बाधितांचा मृत्यू झाला. त्यातील ६० वर्षीय महिला यावल तालुक्यातील न्हावी, तर ५८ वर्षांचा रुग्ण कासाेदा (ता.एरंडोल) येथील अाहे. त्याच्या केस पेपरवर शहरातील शांती नगरातील रहिवासी असल्याचा पत्ता अाहे. तत्पूर्वी, बुधवारी बाेदवड तालुक्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला हाेता.

फक्त ४६ बेड रिकामे

  • ग्रामीण रुग्णालयातील डेडिकेटेड काेविड हाॅस्पिटलमधील सर्व ४० खाटांवर रुग्ण आहेत. तर १२० खाटांच्या डाॅ. बाबासाहेब अांबेडकर वसतिगृहातील कोविड केअर सेंटरमध्ये ७४ रुग्ण दाखल असून ४६ बेड रिकामे अाहे. याच ठिकाणी कोरोनाचे स्वॅब घेतले जातात. त्यात अहवाल पॉझिटिव्ह आल्यास संबंधिताला कोविड सेंटरमध्ये दाखल केले जाते.
  • भुसावळ ग्रामीण रुग्णालयास जुलै २०२० या महिन्यात पीएम केअर फंडातून १० व्हेंटिलेटर मिळाले होते. मात्र, आठ महिन्यांचा कालावधी लाेटला तरीदेखील व्हेंटिलेटर एका खोलीत बंद स्थितीत धूळ खात पडून अाहे. एकीकडे व्हेंटिलेटर अभावी रुग्णांचे जीव जात असताना दुसरीकडे आहे त्या व्हेंटिलेटरचा वापर होत नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. भुसावळ ग्रामीण रुग्णालयातील डेडिकेटेड कोविड रुग्णालयात उपचार घेणारे रुग्ण. दुसऱ्या छायाचित्रात व्हेंटिलेटरचा डेमो दाखवताना आरोग्य कर्मचारी.
बातम्या आणखी आहेत...