आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभरधाव ट्रकने (आयशर) दिलेल्या धडकेत ट्रॅक्टरच्या चाकाखाली आलेल्या दुचाकीस्वार अभियांत्रिकीचा विद्यार्थी जागीच ठार झाला. शुक्रवारी दुपारी २ वाजता महामार्गावर खाेटेनगरजवळ हा अपघात घडला. दुचाकीवर असलेला एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रशांत भागवत तायडे (वय ३०, रा. गहूखेडा, ता. रावेर) असे मृत तरूणाचे नाव आहे. तर जयेश द्वारकानाथ पाटील (वय २३, रा. गहूखेडा, ता. रावेर) हा गंभीर जखमी झाला. त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघे जण धरणगाव तालुक्यातील चिंचपुरा येथील आबासाहेब शिवाजीराव सिताराम पाटील इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटेक्नीक येथे मेकॅनिकल डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहेत. डिप्लोमाची परीक्षा असल्याने शुक्रवारी ६ जानेवारी रोजी तिसरा पेपर असल्याने दोघे मित्र सकाळी गहूखेडा येथून दुचाकीने (एमएच १९ सीपी २३५५) जळगावमार्गे चिंचपुरा येथे जाण्यासाठी निघाले. दुपारी २ वाजता जळगावातील खोटेनगर जवळील वाटिकाश्रम समोरील राष्ट्रीय महामार्गवर भरधाव ट्रकने (क्र. एमएच १९ सीवाय ८१६७) दुचाकीला पाठीमागून धडक दिली. त्यामुळे दुचाकीवरील दोघेजण रस्त्यावर काेसळले.
त्याचवेळी समोरून खडीची वाहतूक करणारे ट्रॅक्टर (क्र. एमएच १९ एएन २४३८) आले. ते प्रशांत तायडेच्या डोक्यावरून गेल्याने ताे जागीच ठार झाला. तर पाठीमागे बसलेला त्याचा मित्र जयेश द्वारकानाथ पाटील हा गंभीर जखमी झाला. जळगाव तालुका पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जावून मृतदेहाचा पंचनामा केला. त्याच्या पश्चात आई, वडील व दाेन विवाहित बहिणी आहेत.
गतिराेधक उभारा अन्यथा आंदाेलनाचा इशारा खाेटेनगरजवळ शुक्रवारी झालेल्या अपघातात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. त्यामुळे महामार्गावर खाेटेनगर व द्वारकानगर येथे गतीराेधक उभारण्याची मागणी राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ता याेगेश देसले यांनी केली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्तरित्या अंमलबजावणी करावी अन्यथा महामार्गावर चक्काजाम आंदाेलन करण्याचा इशारा दिला आहे. या संदर्भात न्हाईचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा यांनी रस्ता सुरक्षा समितीकडे प्रस्ताव सादर करण्याचे आश्वासन दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.