आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंपी प्रतिबंधक उपाय:चारच दिवसांत १३ हजार गुरांचे लसीकरण; बोदवडमधून पाच गावातील नमुने पुण्याला रवाना, आता अहवालाची प्रतीक्षा

बोदवड25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुका पशुवैद्यकीय विभागाने लंपी स्कीन डिसिजच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील १९ गावांमध्ये १३ हजारांवर जनावरांचे चार दिवसात मोफत लसीकरण केले. दरम्यान, तालुक्यात लंपीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी साथरोग प्रतिबंधक कायदा लागू केला आहे. या पार्श्वभूमीवर गुरांचा बाजारदेखील बंद आहे. दुसरीकडे तालुक्यात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची वाणवा असली तरी उपलब्ध मनुष्यबळाने पशुधनाच्या लसीकरणासाठी युद्धपातळीवर प्रयत्न चालवले आहेत.

तालुक्यातील साळशिंगी, जलचक्र, एणगाव, जामठी व घाणखेड या पाच गावातील जनावरांमध्ये लंपीची लक्षणे आढळली होती. या प्रत्येक गावातून एक नमुना घेऊन तो पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवला आहे. तसेच बाधित जनावरे आढळल्यास तेथील पाच किमी अंतराच्या आतील सर्व गुरांचे शंभर टक्के लसीकरण होणार आहे. तूर्त तालुक्यातील एकूण २३ हजार पशुधनापैकी आतापर्यंत १३ हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले. त्यात करंजी पाच देवळी या गावात ७०० जनावरांचे लसीकरण झाले. अन्य १९ गावांमध्येही लसीकरण झाले. त्यासाठी पशुधन पर्यवेक्षक डॉ.नीळकंठ पाचपांडे, पशुधन विकास अधिकारी डॉ.दीपक साखरे, डॉ.हेमंत वाघोदे व जामनेर येथील डॉ.भारती, डॉ.एकनाथ खोडके यांचे सहकार्य मिळत आहे.बोदवड तालुक्यात केवळ एक पशुधन अधिकारी व तीन पर्यवेक्षक असे कर्मचारी कार्यरत आहे. मनुष्यबळाची कमतरता असल्याने जामनेर तालुक्यातून ६ पशुधन अधिकारी व अन्य ४ कर्मचारी आणि बोदवड तालुक्यातील २५ खासगी डॉक्टर व इतर मिळून एकूण ५० जणांपैकी १० जणांची एक मिळून पाच टीम तयार केल्या आहेत. शासनाने १२ हजार लस उपलब्ध केल्या. तर बीडीओंनी १ लाख १० हजार रुपये विशेष निधी म्हणून राखीव ठेवले आहेत. लस खरेदीसाठी त्याचा वापर होईल.

तातडीने उपचार करावे
ज्या गुरांच्या अंगावर गाठी आहेत, त्यांना इतर निरोगी गुरांसोबत गोठ्यात एकाच ठिकाणी बांधू नये. किंवा सार्वजनिक हौदामध्ये पाणी पाजू नये. लंपी हा आजार गोचीड आणि माशा यांच्या माध्यमातून पसरतो. त्यामुळे खबरदारी घ्यावी.
डॉ.नीळकंठ पाचपांडे, पशुधन पर्यवेक्षक, बोदवड

बातम्या आणखी आहेत...