आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदर्श गांव:मेहनतीला शासकीय योजनांची जोड म्हणून शेतकरी आत्महत्यामुक्त ठरतेय विवरे गाव

रावेर / वासुदेव नरवाडे23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘केळीची पंढरी’ असलेल्या रावेर तालुक्यातील ८ हजार लोकसंख्येच्या विवरेची ओळख बागायतदारांचे गाव अशी आहे. कोणतीही नैसर्गिक आपत्ती, केळी भावात पडझड झाली तरी मेहनतीवर विश्वास असलेले येथील शेतकरी रक्ताचे पाणी करून आव्हानांना भिडण्याची जिगर ठेवतात. पुन्हा उभारी घेण्यासाठी शासकीय योजनांचा आधार घेतात. यामुळेच की काय सन २००९नंतर या गावात शेतकरी आत्महत्येची घटना झालेली नाही.

न परवडणारी शेती, मुला-मुलींचे शिक्षण, विवाह, आरोग्यविषयक समस्यांच्या विवंचनेत सापडल्याने शेतकरी गोंधळतात. वेळप्रसंगी कटू निर्णय घेतात. मात्र, विवरे येथील शेतकरी या आव्हानांना निधड्या छातीने सामोरे जाण्याची हिंमत ठेवतो. त्यात गेल्या काही वर्षांपासून केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांनी शेतकऱ्यांना उभारी दिली आहे. यापैकी बहुतांश योजनांचा लाभ प्रत्यक्ष बँक खात्यावर व्यक्तीगत स्वरुपात मिळतो. त्यामुळे आर्थिक टेकू मिळून पुढे पाऊल टाकणे शक्य होते. या योजनांना मेहनतीची जोड देऊन विवरे येथील शेतकरी काळ्या मातीत राबतो. या सकारात्मक वृत्तीमुळेच गेल्या दशकभरात गावात शेतकरी आत्महत्येची घटना नाही. त्यामुळे अनेक जण ‘माझे गाव शेतकरी आत्महत्या मुक्त गाव’ असे अभिमानाने सांगतात.

या योजना लाभदायक शासनाकडून हवामानावर आधारित पीक विमा योजना, बिनव्याजी कर्जपुरवठा, कर्जमुक्ती योजना, करपा निर्मूलनासाठी अनुदानावर औषधी, केळी वाहतुकीसाठी अनुदानावर रेल्वे, कोल्ड स्टोअरेजसाठी अर्थपुरवठा केला जातो. यामुळे शेतकऱ्यांना तोल सांभाळता येतो. आत्महत्येसारखे पाऊल उचलण्यापेक्षा तो पुन्हा उमेदीने उठून उभा राहतो.

रोहयोत शेतीकामे हवी वाढत्या मजुरीमुळे शेती कसणे आता सोपे राहिलेले नाही. त्यामुळे रोजगार हमी योजनेंतर्गत शेतीची खुरपणी, कोळपणी, वखरणी, नांगरणी, लागवड, कापणी, केळी खोड फेकणे ही कामे समाविष्ट करा. सौर उर्जेवरील कृषी पंप द्यावा, जेणे करून वीज बिलापासून सुटका होईल. युनूस तडवी, सरपंच, विवरे बुद्रूक

आर्थिक ताळमेळ साधा नैसर्गिक आपत्ती, रोगराईचे थैमान यामुळे केळी उत्पादक मेटाकुटीस आला होता. मात्र, शासनाच्या योजना, मदतीचा आधार वाटतो. शेती कसण्याच्या पद्धतीत सर्वांनी गरजेनुसार बदल स्वीकारावा. उत्पन्न-खर्चाचा ताळमेळ साधावा. रफीक शे. बिसमिल्ला, शेतकरी, विवरे, ता.रावेर

बातम्या आणखी आहेत...