आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी लक्षवेधी:भुसावळात विजेची उधळपट्टी, 550 पथदिवे 24 तास सुरू; अनागोंदी यापूर्वी विधानसभेत प्रश्न, तरीही पालिकेचे दुर्लक्ष कायम

भुसावळ24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात पालिकेच्या हेकेखोर कारभारामुळे पथदिव्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. गणेशोत्सवात रात्री भाविकांची रस्त्यावर गर्दी वाढलेली असताना प्रमुख व अंतर्गत मार्गावरील बहुतांश पथदिवे बंद आहेत. दुसरीकडे शहरातील ८ हजार पैकी सुमारे ५५० पथदिवे दिवसा देखील सुरु असल्याने विजेची उधळपट्टी होत आहे. शहरात पालिकेच्या माध्यमातून अंतर्गत व सेंट्रल पोलवर ८ हजार पथदिवे आहेत. अंतर्गत भागातील पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीचा कंत्राट पालिकेने ईईएसएल या कंपनीला दिला आहे.

तर सेंट्रल पोल पालिकेच्या अंतर्गत आहेत. शहरातील तब्बल ५५० दिवे सध्या २४ तास सुरु आहेत. संतोषी माता मंदिर परिसर, कस्तुरी नगर, खडका रोड, पाटील मळा, सुरभी नगर रिंगरोड, नेब कॉलनी, सहकार नगर, श्रीनगर, भिरूड कॉलनी, वाल्मीक नगर या भागातील पथदिवे दिवसा सुरू असतात. रविवारी जळगाव रोड, यावल रोडवरील सेंट्रल पोलवरील दिवे, तर सहकार नगरातील अंतर्गत पथदिवे सुरु होते. दुसरीकडे ऐन गणेशोत्सवात जामनेर रोड, व्हीएम वॉर्ड, यावल रोडवरील साई जिवन शॉप ते तापी नगर रिक्षा स्टॉप पर्यंतचे दिवे रात्रीही बंद असतात.

भरदिवसा वीजचोरीचाच प्रकार
शहरात पथदिव्यांसाठी घरगुती वाहिनीवरून वीज जोडणी घेतल्याने ते २४ तास सुरु राहतात. हा प्रकार म्हणजे विजेची चोरी आहे. बिल थकल्यास सामान्य ग्राहकांना वेठीस धरणारे महावितरणचे अधिकारी या विजचोरीकडे मात्र दुर्लक्ष करतात.

प्रशासकीय राजवटीत प्रश्न बिकट
शहरात पालिकेच्या कारभारावर नगरसेवकांकडून लक्ष ठेवले जात होते. मात्र, गेल्या नऊ महिन्यांपासून पालिकेवर प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती आहे. मात्र, त्यांचे नियंत्रण नसल्याने मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांचा एकछत्री अंमल आहे. त्यांनी पथदिवे, गटारी, स्वच्छता आदी प्रश्न सोडवण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.

वेतनातून वसुली करावी
२४ तास सुरु किंवा बंद असलेल्या दिव्यांबाबत पालिकेकडे तक्रार केल्यावरही प्रश्न सुटत नाहीत. यामुळे दररोज किमान १ हजारावर युनिट विजेची नासाडी होते. ही रक्कम पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून वसूल करावी.
शिशिर जावळे, अध्यक्ष, नमो विचार मंच

दोन महिन्यांत प्रश्न सुटेल
प्रोफेसर कॉलनी, जामनेर रोड भागात तांत्रिक अडचणींमुळे दिवे सुरू आहेत. तोच प्रकार सहकार नगर, जळगाव रोडवर असावा. आम्ही महावितरणला पत्रव्यवहार केला आहे. दोन ते तीन महिन्यांत हा प्रश्न सुटेल, उपाययोजना सुरु आहेत.
सूरज नारखेडे, प्र.विद्युत अभियंता, पालिका

बिलातून वसुली तरीही फरक नाही
शहरात होणाऱ्या विजेच्या उधळपट्टीबाबत ‘दिव्य मराठी’ने ६ जून २०२१ रोजी वृत्त प्रसिद्ध केले. यानंतर आमदार संजय सावकारे यांनी विधानसभेत प्रश्न मांडला होता. यानंतर तत्कालिन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विजेची नासाडी मान्य करून ईईएसएल कंपनीच्या देयकातून १ लाख ८१ हजार रुपये कपातीचे आदेश दिले होते. तरीही कंपनी, पालिकेचे प्रशासक, मुख्याधिकाऱ्यांना फरक पडलेला नाही.

बातम्या आणखी आहेत...