आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीबाणी:छायादेवीनगर, साक्री फाटा, गोलाणी भागात खासगी टँकरने पाणी

भुसावळ14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कंडारी शिवारात येणाऱ्या आणि वरणगाव महामार्गालगत असलेल्या छायादेवी नगर, साकरी फाटा, गाेलाणी परिसरात तब्बल १९९२ पासून पाणीटंचाई आहे. गेल्या ३० वर्षांत थातूरमातूर प्रयत्न वगळता साडेपाच हजार रहिवाशांची तहान भागवण्यात प्रशासन आणि राज्यकर्त्यांना यश आले नाही. आता तेथे शासनाकडून दररोज तीन टँकर पाणी पुरवले जाते. मात्र, ते पुरेसे नसल्याने रहिवाशांना खासगी कूपनलिका, टँकरचे पाणी विकत घ्यावे लागते. साक्री फाटा परिसरातील मकरंद नगरात काही रहिवाशांनी टंचाईला कंटाळून घरे विक्रीला काढली आहेत. दिव्य मराठीने या भागात पाहणी केली असता हे चित्र समोर आले. सकाळी १०.३० वाजता छायादेवी नगर, साकरी फाटा, गाेलाणी परिसरात तापमानामुळे सामसूम होती. छाया देवी नगरात सावलीत बसलेल्या तिघांना पाणीपुरवठ्याबद्दल विचारताच टंचाईचा पाढा वाचला. दरवर्षी टंचाई असते. मात्र, कोरोना काळात सर्वाधिक हाल झाल्याचे सांगितले. तेथून पुढे साकरी फाटा परिसरात गेलो. या भागात दलित वस्ती सुधार याेजनअंतर्गत कंडारी ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा योजना केली होती. मात्र, पाच वर्षांपासून ती बंद पडल्याने टंचाईची तीव्रता वाढली आले. काही महिलांनी सोमवारनंतर या भागात शासनाचे टँकर दिसले नाही.

ग्रामीण पाणीपुरवठा विभाग उपअभियंता एस.पी.लोखंडे
यांना थेट प्रश्न
प्रश्न : छायादेवी नगर, साक्री फाटा, गोलाणी परिसर टंचाईग्रस्त का?
उत्तर : होय टंचाई आहे. या भागाचा टंचाई आराखड्यात
समावेश केला आहे. तूर्त कंडारी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाण्याचे टँकर सुरू केले आहे.
प्रश्न : या भागात नियमित टँकर येत नाही, अशी ओरड आहे?
उत्तर : टँकरने पाणीपुरवठ्याचे नियोजन ग्रामपंचायत करते. सध्या वरील प्रत्येक भागात
टँकरची दररोज
एक फेरी होत आहे.
प्रश्न : दरवर्षी या भागात टंचाई असते. कायमस्वरूपी उपाय का नाही?
उत्तर : जल जीवन मिशन अंतर्गत १४ काेटी रूपये खर्चाची पाणीपुरवठा योजना मंजूर आहे. निविदा निघाली असून लवकरच काम सुरू होणार आहे.

पुन्हा गळती, आज भुसावळात पाणी पुरवठा होणार नाही
पालिकेच्या तापी नदीतील बंधाऱ्यातून रॉ वॉटर उचल करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला मंगळवारी रात्री रेल्वे कॉलनीत भगदाड पडले होते. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने बुधवारी युद्धपातळीवर काम करत रात्री १२ वाजेपर्यंत दुरुस्ती पूर्ण केली. जलवाहिनीची चाचणी घेऊन रात्रीच शहरातील पाणीपुरवठा सुरू केला. मात्र, हा आनंद केवळ १२ तास टिकला. कारण, पुन्हा याच ठिकाणी जलवाहिनीला किरकोळ गळती लागली. त्यामुळे शुक्रवारी (दि.६) पुन्हा पाणीपुरवठा बंद असेल. दुरुस्तीनंतर तो शनिवारी सुरळीत होईल. भुसावळचे तापमान गेल्या पावणेदोन महिन्यांपासून ४० अंशांपेक्षा जास्त आहे. यामुळे पाण्याचा वापर वाढला आहे.

आज या भागात पाणी नाही
शुक्रवारी शहरातील अष्टभुजा देवी मंदीर परिसर, दीनदयाल नगर, जामनेर राेड या भागात पाणीपुरवठा होणार नाही. ताे अर्धा अथवा एक दिवस पुढे ढकलला जाईल. साधारणपणे शनिवारी पाणीपुरवठा होईल.

बातम्या आणखी आहेत...