आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळ्यात टंचाई:आठ ऐवजी 9दिवसांनी पाणीपुरवठा; तापीतील बंधाऱ्याची पातळी घसरली

भुसावळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पालिकेच्या तापी नदीतील साठवण बंधाऱ्याची पाणी पातळी डिसेंबरच्या मध्यातच घसरली आहे. यामुळे शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्याचा रोटेशनवर परिणाम होऊन ८ ऐवजी ९ दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. किमान आठवडाभर ही स्थिती राहील. दरम्यान, हतनूर धरणातून सोडलेल्या आवर्तनाचे पाणी बंधाऱ्यात पोहोचण्यासाठी गुरुवारपर्यंत वाट पाहावी लागेल. यानंतर बंधारा भरल्यावर शहराच्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पूर्वपदावर येण्यासाठी किमान आठवडा लागेल. तोपर्यंत भुसावळकरांना पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागेल.

शहराच्या पाणीपुरवठ्याचा मुख्य स्त्रोत तापी नदीतील बंधारा आहे. नोव्हेंबरपर्यंत तापी नदी पात्र खळाळते असल्याने या बंधाऱ्यात बऱ्यापैकी जलसाठा होता. त्यामुळे किमान जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात हतनूर धरणातून आवर्तनाची आवश्यकता भासेल असा अंदाज होता. मात्र, बंधाऱ्याची जल पातळी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातच घसरली.

यामुळे पाणी उचल कमी होऊन शहराच्या पाणीपुरवठ्याचे रोटेशन एक दिवस पुढे ढकलले गेले. आता ८ ऐवजी ९ दिवसांनी पाणी मिळतेय. ही स्थिती असली तरी चिंता करण्याचे कारण नाही. कारण, हतनूर धरणातून सोडलेले आवर्तन दोन दिवसांत पालिकेच्या बंधाऱ्यात पोहोचेल. यानंतर बंधारा तुडुंब भरताच आठवडाभरात शहरात पूर्वीप्रमाणेच ८ दिवसांआड पाणीपुरवठा होईल. तो लवकर पूर्वपदावर आणण्यासाठी पालिकेचे प्रयत्न आहेत.

शहरात २३ हजार नळ कनेक्शन
शहरात घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक या प्रकारचे एकूण २३ हजार नळ कनेक्शन आहे. मात्र, या सर्व ठिकाणी एकाचवेळी पाणीपुरवठा होत नाही. ८ दिवसांआड एकाचवेळी सुमारे अडीच हजार नळ कनेक्शन धारकांना पाणीपुरवठा केला जातो. पालिकेच्या जलशुद्धीकरण यंत्रणेचे पुनरुज्जीवन झाल्यानंतर रोटेशनचा कालावधी मार्च महिन्यानंतर आणखी कमी होणार आहे.

दररोज २२ दलघमी उचल
पालिका तापी नदीतील बंधाऱ्यातून २४ तासांत सरासरी २२ दलघमी पाणी उचलते. त्यावर शुद्धीकरण प्रक्रिया करताना २० टक्के म्हणजे सरासरी ४ दलघमी पाणी वाया जाते. रॉ वॉटरमध्ये गाळ व शेवाळाचे प्रमाण जास्त असल्याने हे पाणी वाया जाते. यानंतर शुद्ध केलेले १८ दलघमी पाणी वेळापत्रकानुसार भुसावळ शहरात वितरीत केले जाते.

बंधाऱ्याची क्षमता ३५ दिवसांची
पालिकेच्या तापी नदीतील बंधाऱ्यातील जलसाठा शहराला किमान ३५ दिवस पुरतो. पावसाळ्यात तापी निरंतर वाहती असल्याने अडचण येत नाही. यंदा देखील नोव्हेंबरपर्यंत पात्र वाहते होते. त्यामुळे हतनूर धरणातून जानेवारीत आवर्तनाची मागणी होईल असे चित्र होते. पण, प्रत्यक्षात महिनाभर आधीच आवर्तनाची आवश्यकता भासली. आता बंधारा भरल्यानंतर जानेवारी अखेरपर्यंत साठा टिकेल.

आठवड्याने समस्या सुटेल
बंधाऱ्यातील साठा कमी झाल्याने पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक एक दिवस पुढे ढकलले आहे. मात्र, ही समस्या केवळ आठवडाभर असेल. हतनूरच्या आवर्तनाने बंधारा भरल्यावर आठवडाभरात वेळापत्रक पूर्वपदावर येईल. प्रत्येकाने पाण्याचा काटकसरीने वापर करावा. - सतीश देशमुख, पाणीपुरवठा अभियंता, नगरपालिका.

बातम्या आणखी आहेत...