आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनता बेहाल:29 किमी वेगाच्या वाऱ्याने 8 ठिकाणी तुटल्या तारा, 18 वेळा वीज खंडित ; मान्सून उंबरठ्यावर, तरीही देखभाल न केल्याचे परिणाम

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मान्सून दारात उभा असूनही महावितरणने यंदाच्या उन्हाळ्यात मान्सूनपूर्व कामांची निविदा प्रक्रिया केली नाही. परिणामी शहरात ठिकठिकाणी वीज तारांना स्पर्श करणाऱ्या झाडांची छाटणी झाली नाही. त्यात शुक्रवारी रात्रीपासून ताशी २९ ते ५२ किमी वेगाने वारे वाहत असल्याने शनिवारी दिवसभरात सहा ठिकाणी वीज तारा तुटल्या. यामुळे उत्तर व दक्षिण भागात तब्बल १८ वेळा वीजपुरवठा खंडित झाला. यानंतरही विजेचा लपंडाव सुरुच होता. महावितरणकडून मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीची कामे एप्रिल महिन्यात आटोपली जातात. यंदा मात्र शहरातील कोणत्याही भागात ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती, वीज तारांना इन्सुलेटर बसवणे, एकमेकांना स्पर्श करणाऱ्या तारांमध्ये रबराचे विभाजक बसवण्याचे काम झाले नाही. पावसाळ्यात सर्वाधिक बिघाड झाडांच्या फांद्या वीज तारांना स्पर्श करत असल्याने होतात. अशा झाडांची छाटणी देखील झाली नाही. या कामांकडे कानाडोळा केल्याचा फटका भुसावळकरांना शनिवारी दिवसभर सहन करावा लागला. कारण, शुक्रवारी रात्रीपासून वाऱ्याचा वेग वाढला आहे. शनिवारी सकाळपासून ते सायंकाळपर्यंत शहरात ताशी २९ ते ५२ किमी वेगाने वारे वाहत होते. यामुळे उत्तर भागात ४, तर दक्षिण भागात २ ठिकाणी वीज तारा तुटल्या. परिणामी वीजपुरवठ्याचा बट्ट्याबोळ झाला. झाडांच्या फांद्यांमध्ये अडकलेल्या विजतारांचा हवेमुळे एकमेकांना स्पर्श होऊन शहरातील दोन्ही भागांत दिवसभरात तब्बल १८ वेळा वीजपुरवठा खंडित झाला. दक्षिण भागातील टिंबर मार्केट, तर उत्तर भागातील न्यायालय फीडर, शांती नगर, सतारे व रेल्वे फीडरवरील ग्राहकांना यामुळे मनस्ताप झाला.

बातम्या आणखी आहेत...