आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरवठा खंडित:उच्च दाब वीज वाहिन्यांचे काम; यावलला १० तास पुरवठा खंडित ; पावसाळापूर्व देखभाल, दुरुस्तीचे काम

यावल2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील सातोद रस्त्यावरील १३२ के.व्ही. वीज उपकेंद्रात उच्च दाबाच्या वीज वाहिन्यांच्या फाउंडेशनच्या कामामुळे शनिवारी तब्बल १० तास वीज पुरवठा खंडित होता. यावेळी शहरासह ग्रामीण भागातील ३३ के.व्ही. वीज वाहिन्यांच्या मार्गावर अडथळा ठरणाऱ्या वृक्षांची छाटणीही करण्यात आली. पावसाळ्यात अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी पावसाळापूर्व देखभाल, दुरुस्तीचे काम केले जात असल्याचे उपकार्यकारी अभियंता रितेश भोळे यांनी सांगितले.

पावसाळ्यापूर्वी राज्य महावितरण कंपनीच्या वतीने शनिवारी १३२ के.व्ही. उपकेंद्रात देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. यात प्रामुख्याने सातोद रस्त्यावरील उपकेंद्रात उच्च दाबाच्या वीज वाहिन्यांसाठी सिमेंटचे जुने फाउंडेशन काढून तेथे अद्यावत लोखंडी फाउंडेशन बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाकरिता सुमारे १० तासांचा वेळ लागला. या संपूर्ण काळात शहरासह विविध उपकेंद्रातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. तर या दरम्यान यावल ३३ के.व्ही., दहिगाव ३३ के.व्ही. व धानोरा ३३ के.व्ही. क्षमतेच्या वीज वाहिन्यांच्या मार्गात येणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी देखील या वेळेत महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आली. हे संपूर्ण काम यावल १३२ के.व्ही. उपकेंद्राचे उपकार्यकारी अभियंता रितेश भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तर दिवसभर वीज पुरवठा खंडित राहिल्याने विजेवर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांचे कामकाज ठप्प झाले होते.

पोलिस ठाण्यात काम ठप्प

विविध प्रकारच्या नोंदीसह दखलपात्र व अदखलपात्र गुन्हे नोंद करण्याचे यावल पोलिस ठाण्यातील नेहमीचे काम ठप्प झाले होते. पूर्वी हस्तलिखीत स्टेशन डायरीसाठी आता संगणकात सीसीटीएनएस या प्रणालीने स्थान घेतले आहे. परिणामी शनिवारी दिवसभर पोलिसांनी कागदावर नोंदी घेतल्या. आणि वीज पुरवठा सुरू झाल्यानंतर तक्रारदारांना पोलिस ठाण्यात या, असे कळवताना पोलिस कर्मचारी दिसत होते.

बातम्या आणखी आहेत...