आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद व जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कन्नड घाटात गेल्या तीन दिवसांपासून वाहतूक कोंडी होत आहे. सलग दाेन सुट्ट्या, त्यात लग्नाची तारीख यामुळे कन्नड घाटातून येणाऱ्या-जाणाऱ्या लहान वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. यातच घाटात वाहनांची लेन, शिस्त पाळली जात नाही, लहान वाहनधारक पुढे जाण्याची घाई करत असल्याने वाहतुकीच्या नियमांचा फज्जा उडाला. सोमवारी सकाळी घाटात तीन ट्रक रस्त्यातच फेल झाले. परिणामी, तब्बल दहा तास वाहतूक ठप्प झाली व तीन किमी वाहनांच्या रांगा लागल्या. सुमारे ४०० वाहने अडकून पडली.
घाटाच्या दुरुस्तीनंतरही गेल्या चार महिन्यांपासून कन्नड घाटात वाहतुकीची कोंडी होत असून तासन्तास वाहने अडकून पडतात. सोमवारी पहाटे म्हसोबा मंदिर पॉइंट, महादेव मंदिर व यू टर्न अशा तीन ठिकाणी अवजड ट्रक रस्त्यामध्येच नादुरुस्त झाले. त्यामुळे घाटातील वाहतूक ठप्प झाली होती. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मागेही जाता येईना आणि पुढेही जाता येईना, अशी अडकलेल्या वाहनधारकांची स्थिती झाली होती. दोन्ही बाजूंनी वाहने अडकल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. सकाळी ७ वाजेपासून ठप्प झालेली वाहतूक सायंकाळी ५ वाजेनंतर सुरळीत झाली. महामार्ग पोलिस केंद्राचे एपीआय भागवत पाटील, नरेंद्र सोनवणे, जितू माळी, पांडुरंग पाटील, शैलेश बाविस्कर, दिनेश चव्हाण, सोपान पाटील, रमेश पाटील, चंद्रकांत पाटील हे भर उन्हात वाहतूक सुरळीत करण्यासाठी धावपळ करत होते. एका बाजूने २५ तर दुसऱ्या बाजूने २५ वाहने सोडून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.
बाेगद्याचा पर्याय अजूनही कागदावरच
औरंगाबाद- धुळे महामार्गातील महत्त्वाचा भाग असलेल्या कन्नड घाटात वाहतूक कोंडी ही नेहमीचीच समस्या झाली आहे. या घाटात बाेगदा तयार करुन वाहतूकीची कोंडी सोडवावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून सातत्याने होत आहे. औरंगाबाद व जळगाव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी त्यासाठी वारंवार पाठपुरावा केला. मात्र त्यावर अद्याप तरी तोडगा निघालेला नाही. या घाटात बाेगदा पाडणे अवघड असल्याचे समोर आल्यानंतर गाैताळा घाटातून पर्यायी मार्गाचीही चर्चा झाली, मात्र त्यावरही काहीच काम झाले नाही. गेल्या महिन्यात औरंगाबादेत आलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा घाटात बाेगदा करण्याबाबत चाचपणी सुरू असल्याचे सांगितले होते.
लहान वाहनांचा बेशिस्तपणा
सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. त्यातच शनिवार व रविवार लागून सुट्या आल्या की घाटात वाहनांची संख्या वाढते. या गर्दीत लहान वाहनधारक पुढे जाण्याच्या नादात बेशिस्तपणा करतात. त्यामुळे कोंडी होते. शनिवारी घाटात लहान वाहनांची संख्या वाढली होती. रविवारीही सुटी असल्याने त्यात वाहनांची भर पडली.
वाहतूक नियमांचे पालन करा
लहान वाहने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून पुुढे जाण्याचा प्रयत्न करतात. त्यातून वाहतूक कोंडी होते. घाटातील वाहतूक कोंडी टाळायची असेल तर लहान वाहनधारकांनी नियमांचे पालन करून एकेरी मार्गानेच वाहने न्यावीत. रस्त्यात ट्रक बंद पडल्यानेही कोंडी होते.
- भागवत पाटील, एपीआय, महामार्ग
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.