आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएसटी आगारातून भुसावळसाठी निघालेल्या धावत्या बसवर चिंचेचे झाड कोसळले. सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घोडे पीर बाबा दर्गाह परिसरात ही अपघात झाला. त्यात चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र, २९ पैकी १३ जणांना किरकोळ दुखापती झाल्या. जखमींवर यावल ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.
यावल आगारातून एमएच.२०-बीएल.२५४२ या क्रमांकाची बस दुपारी दीड वाजता यावल कडून भुसावळसाठी प्रवासी घेवून निघाली होती. ही बस पाटचारीच्या पुढे घोडे पीर बाबा दर्गाह जवळ आलेली असताना वेगाचे वारे वाहत होते. यावेळी चिंचेचे एक झाड कोसळून धावत्या बसकडे झुकले. हे चित्र डोळ्यासमोर पाहून चालक शालिक बारी यांनी प्रसंगावधान राखून बसचा वेग कमी केला. यामुळे सर्व प्रवासी बालंबाल बचावले.
मात्र, पडलेल्या झाडामुळे बसच्या पुढील भागाचे नुकसान झाले. गाडीतील १३ प्रवासी देखील किरकोळ जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच यावल आगाराचे व्यवस्थापक जी.पी.जंजाळ यांनी सर्व प्रवाशांना रुग्णालयात आणण्याची व्यवस्था केली. हा अपघात झाला तेव्हा किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.मनीषा महाजन या भागातून जात होत्या. त्यांनी तातडीने मदत केली. वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला, डॉ.मनीषा महाजन, अधिपरीचारिका ज्योत्स्ना निंबाळकर, वैशाली बैरागी, पूनम सोनवणे, हेमलता कावडकर, पिंटू बागुल, इरफान तडवी आदींनी प्रथमोपचार केले.
आगार व्यवस्थापक जी.पी. जंजाळ, वाहतूक निरीक्षक कुंदन वानखेडे, सहायक वाहतूक निरीक्षक कमलाकर चौधरी, वाहतूक नियंत्रक के.डी.चौधरी, डी.एन.ठाकरे आदींकडून किरकोळ जखमींना ५००, तर जास्त प्रमाणात जखमींना प्रत्येकी एक हजार अशी १० प्रवाशांना सहा हजारांची मदत करण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.