आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासमजा तुम्ही जंगलात फिरायला गेले आहात. मात्र, फिरताना अचानक तुम्ही वाट चुकलात आणि सायंकाळ झाली. चहूकडे दाट अंधार, विषारी साप, हिंस्र प्राण्यांची भीती, अशा प्रसंगाची नुसती कल्पना केली, तरी अंगावर काटा येतो. मात्र, असा प्रसंग सोमवारी सायंकाळी गौताळा अभयारण्यात फिरण्यासाठी गेलेल्या १५ जणांवर गुदरला. मात्र, जंगलात अडकलेल्या १५ जणांपैकी एकाने, सायंकाळी ७ वाजता खासदार उन्मेष पाटील यांच्या मोबाईलवर संपर्क साधून मदत मागितली. त्यानंतर तातडीने वनकर्मचाऱ्यांनी जंगलात पाच तास शोधमोहीम राबवत, मध्यरात्री १२ वाजता सर्वांना बाहेर काढले.
खासदार उन्मेष पाटील संसदेच्या अधिवेशनासाठी दिल्लीत आहेत. त्यांना सोमवारी सायकांळी जंगलात अडकलेल्यांपैकी एकाने मोबाईलवर फोन करून मदत मागितली. खासदार पाटील यांनीही त्यांना धीर देत तातडीने मदत पोहोचवण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर खासदारांनी यांनी मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे, वन्यजीव वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर देसाई, खासदारांचे स्वीय सहायक अर्जुन परदेशी यांना सूचना दिल्या. त्यानंतर पाच तास वनकर्मचाऱ्यांनी जंगलात शोध घेतला. मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास या १५ जणांना शोधण्यात यश आले. त्यानंतर सर्वांना घेऊन वनकर्मचारी कालीमठच्या दिशेने गेले. तेथूनच सर्वजण आपापल्या घराकडे रवाना झाले.
फिरताना रस्ता चुकले
धुळे येथील १० आणि चाळीसगाव येथील ५ असे १५ जण सोमवारी पाटणादेवीच्या दर्शनाला आले होते. अभयारण्यात फिरताना ते पितळखोरा लेणी पाहण्यासाठी गेले होते. मात्र, परत जाताना सायंकाळी अंधार पडला. त्यामुळे सर्वजण रस्ता चुकले. जंगलात मोबाईलचे नेटवर्क मिळत नसल्याने त्यांची धाकधूक वाढली होती. काही वेळाने मोबाईलला नेटवर्क मिळाल्यानंतर त्यांनी खासदारांशी संपर्क साधला.
शेकोटीभोवती थांबवले
मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे यांनी वाट चुकलेल्या तरुणांशी संपर्क केला. त्यावेळी भयभीत तरुणांनी रडतच आपबिती कथन केली. ठोंबरे यांनी तरुणांना धीर देत शेकोटी पेटवून एकाच जागी थांबण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर ठोंबरे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर देसाई यांच्याशी बोलणे केले. देसाई यांनी वनमजुरांना शोधकार्यासाठी पाठवले.
चौघे वन कर्मचारी ठरले शोधमोहिमेचे हीरो
वन कर्मचारी नागू अगीवले, नवशीराम मधे, अशोक अगीवले, रंगनाथ अगीवले यांनी अंधारात युवकांना जंगलातून बाहेर काढले. धुळे येथील सागर जगताप, देविदास केदार, दीपक वाघ, रुपेश वाघ, प्रशांत पाटील, मयूर पाटील, कुणाल लाड, जयवंत आहिरराव, कुणाल शेलार, सागर लष्कर, चाळीसगाव येथील राहुल सुर्यवंशी, रोहित अंडागळे, बाळा सुरवाडकर, निखिल निंभोरे, उमेश निकम यांची सुटका करण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.