आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणाचा मृत्यू:हनुमंतखेडा येथे वीज पडून 20 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू ; एका क्षणामुळे वाचले दोघांचे प्राण

पाचोराएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

सोयगाव तालुक्यातील हनुमंतखेडा गावासह परिसरात शुक्रवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. दरम्यान, हनुमंतखेडा येथील २० वर्षीय युवक शेतात काम करत असताना अचानक वीज पडल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील हनुमंतखेडा येथे २४ जून रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. दरम्यान, हनुमंतखेडा येथील किशोर परशराम पवार (वय २०) हे या वेळी त्यांच्या शेतात कापूस पिकाच्या सऱ्या पाडण्याचे काम करत होते. मुसळधार पाऊस सुरू असल्याने त्यांनी शेजारील सिसम झाडाचा सहारा घेतला. या झाडाखाली किशोर पवार, त्यांचे काका व चुलत भाऊ हे सर्व थांबले होते. काही वेळ थांबल्यानंतर काका व चुलत भाऊ काही अंतरावर निघून गेले.

दरम्यान, काही क्षणातच माेठा आवाज झाला अन‌् सिसम झाडावर अर्थात ज्या ठिकाणी किशोर पवार थांबले होते, तेथे वीज काेसळली. यामुळे किशोर पवार यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. सुदैवाने काही अंतरावर असलेल्या काका व चुलत भावाचा जीव वाचला. किशोर पवार यांना तत्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी किशोर पवार यांना तपासून मृत घोषित केले. मृत किशोर पवार यांच्या पश्चात आई, वडिल, २ भाऊ, २ विवाहित बहिणी असा परिवार आहे. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही नोंद शून्य क्रमांकाने सोयगाव पोलिस स्टेशनला वर्ग करण्यात आली आहे. किशोर पवार यांच्या अकस्मात मृत्यूने हनुमंतखेडा परिसरात शोककळा पसरली आहे.