आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिरंगाईचा कळस:अमळनेरात भुयारी गटारीवर चार वर्षांत 30 कोटी खर्च, तरी 30% काम अपूर्ण

अमळनेर / अमोल पाटील6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात २०१८ वर्षांपासून भुयारी गटार योजनेचे काम सुरु आहे. मात्र, गेल्या चार वर्षांत शहरात केवळ ७० टक्के कामच पूर्ण झाले आहे. मल:निस्सारण प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर सुरु आहे. परिणामी भुयारी गटारीचे बांधकाम करताना अनेक अडथळे येत असल्याने, चार वर्षात ३० कोटी रुपये खर्च करूनही ही योजना अपूर्णच आहे.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत ७० कोटी रुपयांच्या भुयारी गटार योजनेच्या पहिल्या टप्प्यास अमळनेर शहरात सन २०१८पासून मंजुरी दिली होती. लातूर येथील प्रगती कन्स्ट्रक्शन यांना भुयारी गटार योजेनेचे काम देण्यात आले आहे. त्यांनी सन २०१८साली कामास प्रत्यक्ष सुरुवात केली. या योजनेतील मुख्य ड्रेनेज लाइन ७० किलोमीटरची असून त्यापैकी ५० किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. तर २० किलोमीटर कामाची सुरुवात करण्यात आली आहे. तर एसटीपी प्रकल्पाचे ७० टक्के काम पूर्ण झाले असून ३० टक्के काम अपूर्ण आहे. त्यात अंतर्गत यंत्रसामग्री व मॅकेनिकल वर्कचे काम अपूर्ण आहे. शहरातील अंतर्गत ड्रेनेज व्यवस्थेचे केवळ ५० किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. डीपीआर तयार करताना अंतर्गत ड्रेनेज लाइनच्या अनेक ठिकाणच्या कामांचा योजनेत समावेश करण्यात आलेला नाही. परिणामी काम करताना अनेक अडथळे येत आहेत. मालमत्तांचे कनेक्शन अजून बाकी आहेत.

ही कामे अद्याप अपूर्ण
शहरातून मलनिस्सारण केंद्रापर्यंत सांडपाणी नेण्यासाठी चार पंपिंग सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. त्यापैकी दोन पंपिंग सेंटरची कामे पूर्ण झाली आहेत. तर दोन पंपिंग सेंटरचे काम प्रगतीपथावर आहे. ड्रेनेज लाइनचे काम अपूर्ण आहे. एसटीपी सेंटरचे २० टक्के काम अपूर्ण आहे. काही भागात रस्त्यांचे खोदकाम केले आहे. मात्र, अजून त्या रस्त्यांची दुरुस्ती करून पक्के रस्ते तयार करण्यात आलेले नाहीत.

काेराेनामुळे विलंब, आता दुसऱ्या टप्प्याची तयारी
अमळनेर शहरात सन २०१८पासून भुयारी गटार योजनेस प्रारंभ झाला. हे काम ३६ महिन्यात पूर्ण व्हायला हवे होते. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कामास विलंब झाला. आता काम प्रगतीपथावर असून दुसऱ्या टप्प्याची तयारी करण्यात येत आहे.

-प्रशांत सरोदे, सीओ

कामात अनेक अडथळे... काही भागात नवीन रस्त्यांची निर्मिती करण्यात आली होती. मात्र, गटारीचे काम करताना त्या रस्त्यांवर खोदकाम होणार असल्याने त्यास मंजुरी मिळत नव्हती. मध्यंतरी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन ते अडीच वर्ष सर्वच कामे थांबलेली होती. तसेच खोदलेले रस्ते दुरुस्ती करून नवीन रस्त्यांची निर्मिती करणे, या कामांना अडथळा येत आहे.

बातम्या आणखी आहेत...