आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:अमळनेरातील 32 कोटींच्या रेल्वे उड्डाणपुलावर 6 महिन्यांपासून अंधार

अमळनेर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील चोपडा रस्त्यावर ३३ कोटींच्या निधीतून उभारलेल्या रेल्वे उड्डाणपुलाचे सहा महिन्यांपुर्वी उद्घाटन झाले. या पुलावरील पथदिवे बंद असल्याने, रात्री वाहनधारकांची गैरसोय होते. पथदिवे हस्तांतराबाबचे पत्र कंत्राटदाराने पालिकेला दिले आहे. मात्र, याबाबत निर्णय घेण्यासाठी अद्याप पालिकेत बैठकच झालेली नाही. तर पथदिव्यांचे हस्तांतर होईपर्यंत ते सुरू ठेवण्याची जबाबदारी कंत्राटदाराची आहे, असे पालिका अभियंत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने मध्यमार्ग काढून पथदिवे सुरू करावेत अशी अपेक्षा आहे. संबंधित कंत्राटदार आणि पालिका यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे, वाहनधारकांची गैरसोय वाढली आहे.

शहरातून जाणाऱ्या धुळे-अमळनेर-चोपडा-खरगोन रस्त्यावर, चोपडा रेल्वेगेटजवळ उड्डाणपुलाची उभारणी झाली आहे. या कामासाठी शासनाचा ३३ कोटी रुपयांचा निधी खर्च झाला. या निधीतून उड्डाणपुलाची उभारणी झाल्याने, रेल्वेगेटमुळे होणारी वाहनधारकांची गैरसोय दूर झाली आहे. चोपडा मार्गावरील रेल्वेगेटमुळे वारंवार या भागात वाहतुकीचा खोळंबा होत असे. चोपड्याकडे जाणारी आणि तिकडून येणाऱ्या वाहनांना, रेल्वेगेट बंद असताना सक्तीचा थांबा घ्यावा लागत होता.

मात्र, केंद्र सरकारच्या रस्ते दळणवळण व वाहतूक मंत्रालयाच्या पत्रान्वये उड्डाणपुलास मान्यता देण्यात आली होती. दोन वर्षात हे काम पूर्ण झाल्याने, काही महिन्यांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते व्हर्च्युअल पद्धतीने जळगाव येथून उड्डाणपुलाचे उद्घाटन झाले होते. मात्र, उड्डाणपुल वाहतुकीसाठी खुला होऊनही त्यावरील नऊ खांबांवरील पथदिवे बंद आहेत. त्यामुळे वाहनधारकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.

लुटमारीचा धोका वाढला
उड्डाणपुलावरून रात्री एकट्या जाणाऱ्या दुचाकी वाहनधारकाला अंधाराची भीती वाटते. निर्जन भाग असल्याने अंधाराचा गैरफायदा घेत या ठिकाणी लुटमारीचे प्रकार बळावण्याचा धोका आहे. त्यामुळे उपाययोजना आवश्यक आहेत.

कंत्राटदाराचे पत्र प्राप्त झाले
पथदिवे हस्तांतराबाबत कंत्राटदाराचे पत्र आले आहे. यावर बैठक झाल्यानंतरच पथदिवे हस्तांतरित होतील. तोपर्यंत पथदिवे सुरु ठेवणे ही कंत्राटदाराची जबाबदारी आहे. - प्रशांत ठाकूर, विद्युत अभियंता, अमळनेर

बातम्या आणखी आहेत...