आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यवहार:अमळनेरात मालमत्ता खरेदीचे वर्षात 450 व्यवहार, यंदा 30% अधिक

अमळनेर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन वर्षांचा कोरोना काळ सपल्यानंतर शहरात मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार वाढले आहेत. यंदाच्या वर्षातील अनेक शुभमुहूर्तावर नागरिकांनी मालमत्ता खरेदी करण्यावर भर दिला. त्यातून गेल्या वर्षाची दिवाळी ते यंदाची दिवाळी या काळात शहरात ४५० मालमत्ता खरेदीचे व्यवहार झाले. मागील वर्षाच्या तुलनेने ही आकडेवारी ३० टक्क्यांनी जास्त असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गेल्यावर्षी मालमत्ता खरेदीचे ३१५ व्यवहार झाले होते.

हक्काच्या घराचे स्वप्न उराशी बाळगलेले बहुतांश नागरिक सणासुदीच्या कालावधीत घर खरेदी करतात. कोरोना काळात सणासुदीच्या कालावधीतही घरे, फ्लॅट आणि प्लॉट खरेदीचे व्यवहार मंदावले होते. त्यानंतर बांधकाम क्षेत्राला उभारी देण्यासाठी सरकारने मुद्रांक शुल्कात सवलत दिल्याने घर खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली. गतवर्षीच्या दिवाळीच्या तुलनेत यंदा घर खरेदी वाढल्याचा दावा विकासक करत आहेत. दिवाळीनिमित्त यंदाही विकसकांनी घर खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी विविध सवलती जाहीर केल्या होत्या. यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा घरे आणि प्लॉट खरेदीत ३० टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली आहे.

अॅमेनिटीजला लाभतेय पसंती
शहरात तयार घरांसह विविध आकारातील टु आणि थ्री बीएचके फ्लॅटलादेखील ग्राहकांची अधिक मागणी आहे. त्यात स्वतंत्र पार्किंग व्यवस्था, मुलांसाठी उद्यान, ज्येष्ठांना विरंगुळ्यासाठी लॉन, बैठकव्यवस्था, मंदिर अशाप्रकारच्या विविध सोयीसुविधा असलेल्या अपार्टमेंटला ग्राहक भेट देऊन माहिती घेत आहे. सोसायट्यांची संस्कृतीही शहरात रुजत आहे.

गुंतवणुकीसाठी प्लॉट खरेदी
विस्तारीत भागात अनेक ठिकाणी विकासकांनी मोक्याच्या भूखंडांवर प्लॉटींग केले आहे. त्यामुळे घराचे स्वप्न साकार करण्यासाठी काही कुटुंबिय प्लॉट खरेदीवरही भर देत आहेत. तसेच सुरक्षित गुंतवणुकीसाठी प्लॉट खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. भविष्यात प्लॉटच्या दरवाढीचे गणित लक्षात घेऊन नोकरदार प्लॉटमध्ये गुंतवणूक करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...