आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील रहिवासी भागातून वाहणाऱ्या पिंपळे नाल्यात सध्या मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. तसेच पावसाळ्यात नाल्यात साचलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ठिकठिकाणी पाणी साचले आहे. तसेच रहिवासी भागांमधील सांडपाणीही काही ठिकाणी नाल्यात सोडले आहे. दीर्घकाळ साचून राहिलेल्या या पाण्यात डासांची उत्पत्ती होत आहे. परिणामी नाल्याच्या काठावरील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या भागातील सुमारे पाच हजार रहिवाशांना डेंग्यू, मलेरिया आजारांचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पालिकेने नाल्यात व्यापक स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी आहे.
शहरात दक्षिणेकडून बाजार समितीला लागून पिंपळेरोड व ढेकूरोडकडून उत्तरेकडे मुख्य रहिवासी वस्तीच्या मध्यभागातून पिंपळे नाला वाहतो. कधीकाळी हा नाला शहराबाहेर होता. कालांतराने शहराचा विस्तार वाढत गेल्याने, हा नाला आता शहराच्या अंतर्गत भागात आला आहे. नाल्यालगत नागरी वस्ती असल्याने त्यात कचरा टाकला जातो.
हा साचलेला कचरा आता आरोग्यासाठी घातक ठरत आहे. नागरिकांनी नाल्यात टाकलेला कचरा पाण्यासोबत वाहत जाऊन ठिकठिकाणी साचतो. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होऊन पाणीही तुंबते. साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी परिसरात पसरते. तसेच डासांचा प्रादुर्भाव वाढून नाल्याच्या काठावरील रहिवाशांना त्रास सहन करावा लागतो. सध्या डेंग्यू, मलेरियाचा धोका या भागात वाढला आहे. पालिकेने दखल घ्यावी.
या भागात समस्या... पिंपळे नाल्याच्या काठावर नवीन कॉलन्यांचा विस्तार झाला आहे. नाल्यात साचलेल्या पाण्यामुळे बाजार समितीचा मागील रहिवासी भाग, सुरभी कॉलनी, धुळे रोड, पिंपळे रोड, ढेकू रोडवरील वसाहती यासह प्रताप महाविद्यालयाच्या परिसरातील नवीन वसाहतींना धोका आहे. स्वच्छता मोहीम राबवणे आवश्यक आहे.
कचरा घंटागाडीतच टाकावा
दोन वर्षांपुर्वी पावसाळ्यात नाल्याला मोठा पूर आला होता. त्यामुळे पुराचे पाणी रहिवासी वस्तीत शिरल्याने नुकसान झाले होते. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापुर्वी दरवर्षी नाल्याची साफसफाई करून त्यात साचलेला कचरा व गाळ काढण्याचे काम पालिकेकडून केले. मात्र, परिसरातील नागरिकांनीदेखील आपली जबाबदारी ओळखून प्लास्टीक कॅरिबॅग, बाटल्या व इतर कचरा नाल्यात न टाकता घंटागाडीत टाकणे आवश्यक आहे.
दंडात्मक कारवाई करू
नागरिकांनी नाल्यात कचरा टाकू नये. आपल्या भागात येणाऱ्या पालिकेच्या घंटागाडीतच कचरा टाकावा. नाल्यात कचरा टाकताना कुणीही आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल. - प्रशांत सरोदे, मुख्याधिकारी, अमळनेर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.