आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातब्बल ४ हजार शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदन आणि ४० ग्रामपंचायतींच्या पाठिंब्याचे पत्र घेऊन बोदवड येथील भोले महाकाल फाउंडेशनचे ५० प्रतिनिधी व शेतकरी पुत्रांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पायी दिंडीने मंत्रालयाकडे कूच केले. दीर्घकाळापासून रखडलेल्या बोदवड परिसर उपसा सिंचन योजनेला पुरेसा निधी द्यावा, योजना पूर्ण करावी या मागणीसाठी ही पायी दिंडी मंत्रालयात धडकणार आहे.
रविवारी शहरातील शिवद्वार येथील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस महेंद्र पाटील व फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल गंगतीरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून ही सकाळी ७.३० वाजता पदयात्रा शहरातून निघाली.
नवीन वर्षाची सुरुवात अनेक जण वेगवेगळा संकल्प घेऊन करतात. बोदवड तालुक्यातील तरुणांनी मात्र आपल्या शेतीला पाणी मिळावे व हे पाणी मिळण्याचे स्वप्न असलेली बोदवड परिसर उपसा सिंचन योजना पूर्ण करावी यासाठी मुख्यमंत्र्यांकडे कैफियत मांडण्याचा निर्धार केला आहे. यासाठी ते बोदवडहून पायी चालत मुंबई गाठणार आहेत.
सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलांचा त्यात सहभाग आहे. या सर्वांनी स्वयंपाकाचे सर्व साहित्य सोबत घेतले आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील बोदवड, जामनेर व मुक्ताईनगर आणि विदर्भातील मलकापूर व नांदुरा अशा पाच तालुक्यांसाठी बोदवड परिसर उपसा सिंचन योजना अतिशय महत्त्वाची आहे. १ सप्टेंबर १९९९ रोजी प्रशासकीय मान्यता, त्यानंतर ४ सप्टेंबरला द्वितीय सुप्रमा, ४ सप्टेंबरला सर्व शासकीय मान्यता मिळाल्या आहेत. विशेष म्हणजेच तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी ११ जून २०१० रोजी या योजनेच्या कामाला सुरूवात केली होती. यानंतर निधीअभावी अजूनही काम पूर्ण झालेले नाही.
दोन टप्प्यात प्रस्तावित आहे काम
हतनूर धरणाच्या बुडीत क्षेत्रातून पावसाळ्यात वाहून जाणारे पूर्णा नदीतील १९८.५४ दलघमी पाणी खामखेडा (ता.मुक्ताईनगर) पुलाजवळून पंपाद्वारे उचलणे, हे पाणी पाइपलाइनद्वारे जुनोने व जामठी (ता.बोदवड) साठवण तलावात आणणे नियोजित आहे. या योजनेत एकूण ४२,४२० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल. त्यात १०१ गावांना लाभ होईल. त्यात बोदवड तालुक्यातील ४३, मोताळा १५ जामनेर १४ व मलकापूर तालुक्यातील २३ गावांचा समावेश आहे.
जामनेर-पाचोरा-नांदगावमार्गे नाशिक
रविवारी सकाळी ७.३० वाजता त्यांचा प्रवास सुरू झाला. जामनेर, पहूर, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, विंचूर, निफाड, नाशिक, इगतपुरी, खर्डी, शहापूर, भिवंडी, ठाणे, बांद्रा ते थेट मुंबई मंत्रालय असा तेरा दिवसांत ४६७ किलोमीटरचा प्रवास प्रवास ही पायी दिंडी करणार आहे. दरम्यान, योजनेच्या पहिल्या टप्प्यात जुनोने धरणाचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. दोन ठिकाणी जॅकवेलची कामे सुरू आहे. तर ११ पैकी पाइपलाइनचे काम ४ किमी झाले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.