आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक:मराठी, उर्दू शिक्षकांच्या 560 जागा रिक्त; गुणवत्तेवर परिणाम

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात सध्या एकूण ४० हजार शिक्षकांची पदे रिक्त असून, यात जिल्हा परिषद शाळांमधील १७ हजार ५०३ पदांचा समावेश आहे. रिक्त जागांमध्ये जळगाव जिल्ह्यातील ५६० जागा असून, शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कोरोनानंतर जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढत असून, विद्यार्थी हित लक्षात घेत कंत्राटी पद्धतीने शिक्षकांची नियुक्ती करण्याची आवश्यकता भासत आहे.

सन २०१२ पासून राज्यात शिक्षक भरती बंद आहे. त्यानंतर २०१९ मध्ये शिक्षकांची काही पदे भरण्यात आली; परंतु मागील काही वर्षात बंद पडलेल्या शाळांमधील शिक्षक मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त ठरत आहे. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्याशिवाय शिक्षक भरती होण्याची शक्यता कमी आहे. अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांमध्ये गणित, विज्ञानाचे शिक्षकच नाहीत. भाषा विषयाचे शिक्षक अतिरिक्त आहे; मात्र हे शिक्षक गणित व विज्ञान हे विषय शिकवू शकत नाही. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होऊन शिक्षकांची नेमणूक होणे आवश्यक आहे. त्यानंतरच विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळण्यास सुरुवात होईल.

शिक्षण विभागाने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग व भटक्या विमुक्त जाती, जमाती, विशेष मागासवर्ग, ईडब्ल्यूएस, दिव्यांग यांसारख्या संर्गाची किती पदे रिक्त आहे याची माहिती मागविली आहे; मात्र अद्याप याबाबत माहिती संकलित झालेली नाही.

मानधन देण्याबाबत चाचपणी झाली सुरू
कोरोनानंतर जि.प.शाळांकडे पालकांचा कल वाढलेला आहे. त्यामुळे जि.प. शाळेत विद्यार्थी संख्या वाढलेली आहे. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता जि.प.ने मानधनावर कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती करण्याची गरज निर्माण झाली आहे. दोन शिक्षकी शाळांचीही अवघड परिस्थिती आहे. काही जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदांनी कंत्राटी शिक्षक नेमणूक करून त्यांना पाच हजार रुपये मानधन देण्याबाबत चाचपणी देखील सुरू झाली आहे.

धुळ्याला ३२१ अतिरिक्त शिक्षक
सन २०२१ च्या संचमान्यतेनुसार राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मराठी आणि उर्दू माध्यमाच्या १५ हजार जागा रिक्त आहेत. यात रायगड, यवतमाळ, पालघर, सातारा या जिल्ह्यात एक हजाराहून अधिक पदे रिक्त आहेत. तर बीड आणि धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त शिक्षक आढळून आले आहे.

बातम्या आणखी आहेत...