आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सार्वजनिक मिरवणूक:अमळनेरात ७४ मंडळे देणार बाप्पाला निरोप; मंगळग्रह मंदिराजवळ निर्माल्य संकलन केंद्र

अमळनेर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाप्पाला निरोप देण्यासाठी पोलिस व पालिका प्रशासन सज्ज झाले आहे. शहरातील ७४ सार्वजनिक मंडळांच्या बाप्पांचे आज विसर्जन केले जाणार आहे. यंदा १३ गावांमध्ये एक गाव एक गणपती संकल्पना राबवण्यात आली आहे. शहरात सकाळी आठ वाजेपासून घरगुती गणपतींचे विसर्जन सुरू होणार आहे. तर सायंकाळी सहा वाजेपासून सार्वजनिक गणपती मंडळे विसर्जन मिरवणुक काढणार आहेत. शहरातील सर्वच भागातील सार्वजनिक मंडळे आपली विसर्जन मिरवणूक दगडी दरवाजापर्यंत आणतात. तेथेच मिरवणुकीची सांगता होते.

तेथून पुढे सावखेडा येथील तापी नदीपात्रापर्यंत वाहनाने मूर्ती नेली जाते. तर घरगुती गणेश मूर्तींचे मंगळ ग्रह मंदिराजवळील तलावात विसर्जन करता येणार आहे. तालुक्यातील सर्व मंडळांसाठी सावखेडा येथील तापी पात्रात विसर्जनाची सुविधा प्रशासनाने केली आहे. त्याठिकाणी तापी नदीपात्राला लागून लोखंडी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. तर तहसील, पालिका, पोलिस व अग्निशमन कर्मचारी तैनात असतील. त्यांच्यासोबत पट्टीचे पोहणारे, बोट, लाईफ जॅकेट्स व रुग्णवाहिका असेल.

असा असेल पोलिस बंदोबस्त
मिरवणूक निर्विघ्न पार पडावी यासाठी ८ पोलिस अधिकारी, ४५ कर्मचारी, ३७ गृह रक्षक दलाचे जवान, आरसीपी व स्ट्रेकिंग फोर्सची तुकडी असा बंदोबस्त आहे. मिरवणुकीत अनुचित प्रकार घडत असेल तर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी केले आहे.

तात्पुरती वाहतूक वळवणार
शहरात सर्व बाजूने गणपती विसर्जन मिरवणुका निघणार आहेत. त्यामुळे मुख्य रस्त्यांवर वाहतुकीचा खोळंबा होऊ नये, याची दक्षता घेतली जात आहे. रात्री उशिरा सर्व मंडळे दगडी दरवाजाजवळ एकत्र येणार असल्याने, वाहतूक सुभाष चौकमार्गे तात्पुरती वळवली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...