आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराजस्थानकडून मुंबईकडे भरधाव जाणारा कंटेनर सोमवारी (४ मार्च) रात्री चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी दोन तास पाठलाग करून पकडला. ८२ लाख २५ हजार रुपयांचा गुटखा, २० लाखांच्या कंटेनरसह एकूण एक कोटी २ लाख २५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कंटेनरमध्ये १३० प्लास्टिक गोण्यांमध्ये गुटख्याची पाकिटे आढळली. गेल्या दोन महिन्यांतील जळगाव जिल्ह्यातील ही चौथी मोठी कारवाई आहे. चारही कारवायांमध्ये सुमारे चार कोटींपेक्षा अधिक रकमेचा गुटखा पकडला गेल्याने तस्करांचे धाबे दणाणले आहे.
एका गुन्ह्याच्या तपासासाठी सोमवारी मालेगाव रोड येथे चाळीसगाव ग्रामीण पोलिसांचे पथक तैनात हाेते. तिथे बेलगंगा कारखान्याजवळ एक कंटेनर भरधाव वेगाने जाताना दिसला. संशय आल्याने पोलिसांनी सिनेस्टाइल पाठलाग केला. पळून जाण्याच्या नादात कंटेनरचालकाने पाेलिसांच्या वाहनाला दाेनवेळा धडक देण्याचा प्रयत्न केला. तसेच एक दुचाकी व कारला हुलकावणी दिली. परंतु पाेलिसांनी दाेन तास पाठलाग करून रात्री ११.३० च्या सुमारास हा सीलबंद कंटेनर (एमएच ३८ एबी ६०९६) मालेगावजवळ पकडला. मंगळवारी सकाळी पंचांसमक्ष कंटेनर उघडला असता त्यात गुटख्याचा साठा हाेता. कंटेनर चालक सर्फुखान इद्रिसखान (रा. राजस्थान) याला अटक केली.
तीन कंपन्यांचा सहभाग
मध्य प्रदेश, राजस्थानातून मुंबईत मोठ्या प्रमाणावर गुटख्याची वाहतूक केली जाते. यात तीन कंपन्यांचा सक्रिय सहभाग असल्याचीही चर्चा आहे. पोलिसांचा ससेमिरा व टोलनाके चुकवण्यासाठी गुटखा तस्कर राजस्थान, मध्य प्रदेशातून भुसावळ, चाळीसगाव, मालेगाव मार्गे पुढे मुंबईत जातात.
दाेन तासांचा थरार
भरधाव कंटेनर चालक पाेलिसांना जुमानत नव्हता, आेव्हरटेक करून पुढे गेलेल्या तरूणांच्या कारने चाळीसगाव फाट्याजवळ वाहने आडवी लावून कंटेनर थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु चालकाने तेथे लहानशा जागेतून मार्ग काढत मुंबई-आग्रा रस्त्यावर कंटेनर घेतला. दाेन तास हा थरारक पाठलाग सुरू हाेता. अखेरीस रात्री ११.३० वाजेच्या सुमारास मुंबई-आग्रा हायवेवर पोलिसांनी शिताफीने कंटनेरपुढे वाहने आडवी लावत चालकास थांबण्यास भाग पाडले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.