आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचाळीसगाव तालुक्यात यंदा जिल्हा परिषदेच्या दोन तर पंचायत समितीच्या चार जागा वाढल्याने जिल्हा परिषदेत तालुक्याचे वजन वाढले असले तरी जाहीर झालेल्या गट व गणांच्या आरक्षणाचा मातब्बरांना फटका बसला आहे. दरम्यान, तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ९ गट आणि १८ गणांसाठी गुरुवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. यात दिग्गजांना जिपचे दरवाजे बंद झाल्याने आता त्यांना पंचायत समितीचा आधार आहे.
तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ९ गटांपैकी तळेगाव, उंबरखेड, बहाळ व वाघळी हे ४ गट अनुसुचीत जमाती महिलांसाठी राखीव झाले आहेत. या गटांमध्ये दिग्गजांचे राजकीय स्वप्न भंगले आहे. तर मेहुणबारे, टाकळी प्रचा, पिलखोड, रांजणगाव, घोडेगाव या पाच गटांमध्ये मात्र लढती चांगल्याच रंगतदार होण्याची शक्यता आहे. तर पंचायत समितीच्या १८ गणांपैकी ४ गण राखीव झाले आहेत. तर ओबीसी गणांसह सर्वसाधारण अशा १४ गणांमध्ये चुरशीचा सामना होणार आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या विद्यमान सातही सदस्यांना निवडणूक लढण्यासाठी गटच राहिले नसल्याने. त्यांना आता एकतर राजकीय माघार घ्यावी लागेल वा पंचायत समिती गणांचा आधार घ्यावा लागेल.
तळेगाव- हिरापूर गटात राष्ट्रवादीचे अतुल देशमुख विजयी झाले होते. हा गट अनुसूचित जमाती महिला राखीव झाला आहे. याच गटातील तळेगाव गण सर्वसाधारण तर हिरापूर गण सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाला आहे. उंबरखेड- सायगाव गटात राष्ट्रवादीचे भूषण पाटील यांनाही फटका बसला आहे. हा गट सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाला आहे. बहाळ-कळमडू गटातून राष्ट्रवादीचे शशिकांत साळुंखे यांचाही गट अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. या गटातील कळमडू गण नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी तर बहाळ गण अनुसूचित जमातीसाठी राखीव झाला आहे. मेहणबारे-वरखेडे गट पुर्वी अनुसूचित जमातीसाठी राखीव होता. आता ताे नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी निश्चित झाल्याने येथे मातब्बर रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. भोरस-करगाव गट आता उंबरखेड-भोरस झाला असून या गटात मातब्बरांनी निवडणूकीची तयारी केली होती. मात्र, हा गट अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्याने मातब्बरांच्या आशा धुळीस मिळाल्या. पूर्वीचा पातोंडा-वाघळी गट आता वाघळी-हातले असा झाला आहे. हा गट आता अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव झाल्याने भोळेंची जिल्हा परिषद वारी हुकणार आहे. तर राष्ट्रवादीचे प्रमोद पाटील यांनाही फटका बसला आहे.
गणांमध्ये नवे चेहरे दिसण्याची चिन्हे
पंचायत समितीच्या वाघळी, वरखेडे बुद्रुक, तळेगाव, पिंपरखेड व घोडेगाव या गणांमध्ये आरक्षण सर्वसाधारण तर कळमडू, पातोंडा, रांजणगाव हे गण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला तर टाकळी प्रचा, उंबरखेड हे गण नागरिकांना मागास प्रवर्गासाठी असल्याने तेथेही काट्याच्या लढती होण्याची चिन्हे आहेत. आरक्षणात पंचायत समितीचे सभापती अजय पाटील, उपसभापती सुनील पाटील व जवळपास सर्वच सदस्यांना फटका बसला आहे. यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्ये म्हणजे जिल्हा परिषदेच्या १४ गटात नव्याने सदस्य निवडून येतील. तर पंचायत समिती गणांमध्येही नवेच चेहरे दिसण्याचे एकंदरीत चित्र आहे.
या गटांमध्ये रंगतदार लढत
रांजणगाव-पिंपरखेड गटात आरक्षण बदलल्याने राष्ट्रवादीच्या विद्यमान सदस्य सुनंदा चव्हाण यांना फटका बसला आहे. तर घोडेगाव-वलठाण, रांजणगाव- पिंपरखेड हे दोन गट सर्वसाधारण व पिलखोड-सायगाव हा गट सर्वसाधारण महिला झाल्याने या गटांमध्ये चांगली लढत हाेण्याचे चित्र आहे. तर मेहुणबारे-वरखेडे, टाकळी- पातोंडा हे दोन गट ओबीसी राखीव झाल्याने या लढती गाजतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.