आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्री चक्रधर स्वामींच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या शेंदुर्णीत, महानुभाव पंथाचा आचार माळिका प्रवचन सोहळा महिनाभरापासून सुरू होता. डोळ्याचे पाळणे फेडणाऱ्या मिरवणुकीने गुरुवारी या सोहळ्याची सांगता झाली. मिरवणुकीत देशभरातून आलेल्या ५० हजार भाविकांनी सहभाग नोंदवल्याचा दावा आयोजकांनी केला. महिनाभरापासून पहूर रोडवर आचार माळीका प्रवचन सोहळा मोठ्या थाटामाटात सुरू होता. पाच हजार संत, महंत, तपस्विनी, उपदेशी तेथे मुक्कामी होते. गुरुवारी प्रवचन सोहळ्याची सांगता मिरवणुकीने झाली.
मिरवणुकीत अश्वधारी पाच बग्यांवरून महानुभव पंथाच्या पाच महंतांची मिरवणूक काढण्यात आली. त्यापुढे घोडे, पालखी, रथ, महिलांचे ढोल पथक, भजनी पथके, परिसर रम्य करणारे सनई चौघडा पथक होते. मिरवणुकीच्या मार्गावर रांगोळ्या काढल्या होत्या. दोन्ही बाजूने झेंडे, केळीची खांब लावलेले असल्याने वातावरण भक्तीमय झाले होते. शोभायात्रेत अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन मंडळाचे अध्यक्ष, आचार माळीका प्रवचन सोहळ्याचे प्रवाचक आचार्य लोणारकर बाबा महानुभाव यांचे नागरिकांनी आशीर्वाद घेतले. देशभरातून हजारोंच्या संख्येने असलेले साधू, संत, महंत, तपस्विनींच्या सहभागाचा हा सोहळा शेंदुर्णीकरांनी अनुभवला.
पाच लाख भाविकांची उपस्थिती : गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या प्रवचन सोहळ्याला पाच लाखांपेक्षा अधिक भाविकांनी उपस्थिती दिली. दररोज दहा हजार भाविकांना महाप्रसादाचा लाभ मिळाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी झटणाऱ्या हजारो स्वयंसेवकांचे यावेळी आभार. कार्यक्रमाचा उद्देश नवीन पिढीला सत्संगात जोडून चांगले संस्कार व्हावे हा होता, असे श्री दत्त मंदिर संस्थान शेंदुर्णीचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे आयोजक गोविंद अग्रवाल यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.