आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टॉवर सील:चाळीसगाव पालिकेची कारवाई;4 गाळे, 2 मोबाइल टॉवर सील

चाळीसगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

४५ नळ कनेक्शनही केले खंडित; ५०% कर वसुली
आर्थिक वर्ष संपण्यास दोन दिवस शिल्लक राहिल्याने पालिकेच्या कर वसुलीस वेग आला आहे. २९ रोजी पालिकेच्या पथकाने धडक कारवाई करत ४ गाळे व २ मोबाइल टॉवर सील केले. पालिकेची २९ मार्च अखेर ५० टक्के कर वसुली झाली आहे. पालिका प्रशासनाने आतापर्यंत ४५ थकबाकीदार मालमत्ताधारकांचा पाणीपुरवठा खंडीत केला आहे. कर वसुलीचे अधिकाधिक उद्दिष्ट गाठण्यासाठी आगामी दोन दिवसात वसुलीची धडक मोहिम राबवली जाणार असून नागरिकांनी आपल्याकडील कर भरून सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांनी केले आहे.

शहरात २२ हजार मालमत्ताधारक
दोन वर्षांपूर्वी कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन झाल्याने शहरातील कर वसुलीलाही ब्रेक लागला होता. त्यामुळे गेल्यावर्षी जवळपास ६७ टक्केच कर वसुली झाली होती. कोरोनामुळे पालिकेची अपेक्षित कर वसुली न झाल्याने पालिकेच्या उत्पन्नावरही विपरीत परिणाम झाला होता. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. शहरात सुमारे २२ हजार ४०० मालमत्ताधारक आहेत. तर एकुण १७ हजार ३०० नळ कनेक्शन दिले आहेत.

प्रशासनाची धावपळ
यंदा अधिक कर वसुलीसाठी पालिकेने कंबर कसली आहे. अंतिम नोटीस देवून मालमत्ताधारक कर न भरणाऱ्या थकबाकीदारांचे नळ कनेक्शन तोडण्यात येत आहे. यासाठी मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे व कर निरीक्षक राहुल साळुंखे यांच्या मार्गदर्शनात पथक प्रमुख तथा सहायक कर निरीक्षक दिनेश जाधव, नितिन सूर्यवंशी, प्रवीण तोमर, विलास नेरपगार, जितेंद्र जाधव व कर्मचारी धडक कारवाई करत आहेत. कर वसुलीसाठी प्रशासनाची धावपळ सुरू आहे.

५० टक्के वसुलीचे आव्हान
यंदा पालिकेला घरपट्टीसाठी ९.५० कोटींचे उद्दिष्ट होते. मंगळवारपर्यंत त्यातील ४ काेटी २० लाख रुपये वसूल झाले. पाणीपट्टी वसुलीचे ४ कोटी ५० लाखांच्या उद्दिष्टांपैकी २ कोटी १० लाख रुपये वसूल झाले आहेत. एकूण ६ काेटी ३० लाख वसूल झाले असून जवळपास ५० टक्के वसुली झाल्याची माहिती कर निरीक्षक राहुल साळुंखे यांनी दिली.

कर भरून सहकार्य करावे
३१ मार्चपर्यंत कर भरण्याची मुदत असून मालमत्ताधारकांनी कर भरून नगर परिषद प्रशासनास सहकार्य करावे. तर थकबाकीदांरावर मात्र कारवाई केली जाईल. प्रशांत ठोंबरे, मुख्याधिकारी

बातम्या आणखी आहेत...