आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जि.प. निवडणूक:पालिकेच्या प्रभाग रचनेनंतर आता गट, गण रचनेचा कार्यक्रम जाहीर; ग्रामीण भागातही राजकीय वातावरण आता तापणार

चाळीसगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगरपालिकेच्या प्रभाग रचनेवर सध्या हरकती मागवण्यात येत आहेत. त्यानंतर आता ‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांचाही बिगुल वाजला आहे. दोन दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने जि.प.,पं.स. यांच्या गट, गण रचनेचा कार्यक्रम जाहीर केल्याने शहरानंतर आता ग्रामीण भागातही राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. तालुक्यात जिल्हा परिषदेचे दोन गट तर पंचायत समितीचे ४ गण वाढणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे झेडपीत चाळीसगाव तालुक्याचे महत्त्व वाढणार असून तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यताही राजकीय जाणकार वर्तवत आहेत.

न्यायालयाच्या आदेशानंतर पालिकेच्या प्रभाग रचनेची प्रक्रिया सुरू झाल्याने, त्यानंतर आता जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी गट व गण रचना कधी जाहीर होते, याची उत्सुकता ग्रामीण भागात व्यक्त केली जात होती. न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकांच्या पाठोपाठ मुदत संपलेल्या राज्यातील २५ जिल्हा परिषदा आणि २८४ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने नुकतीच प्रक्रिया सुरू केली आहे. त्यात जळगाव जिल्ह्याचाही समावेश आहे. राज्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समित्यांच्या गट, गण रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

गट, गणांच्या रचनेकडे इच्छुकांचे लक्ष : २०१७ च्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ७ गणांपैकी ४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस तर ३ मध्ये भाजपचे सदस्य निवडून आले होते. तर पंचायत समितीत भाजप आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी ७ सदस्य निवडून आले होते. आता यावेळी जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समिती गणांची संख्या वाढणार असल्याने इच्छुकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून अनेकांनी निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे. ग्रामीण भागातही निवडणूकांचे वेध लागले असून गट व गणांची रचना कशी राहणार, कुठले गाव कुठल्या गटात, गणात जाणार याची साऱ्यांना उत्सुकता लागली आहे.

बातम्या आणखी आहेत...