आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालग्न लावण्यासाठी १ लाख ७० हजार रुपयांची रोकड घेऊन अंगावरील दागिन्यांसह अवघ्या चारच दिवसांत पळ काढणाऱ्या कथित नवरीसह औरंगाबाद येथील टोळीच्या विरोधात तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून चाळीसगाव शहर पोलिसांत फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २५ ते २९ जानेवारी दरम्यान तालुक्यातील पातोंडा येथे हा प्रकार घडला. लग्न करूनही सासरी येण्यास नवरीकडून टाळाटाळ होत असल्याने चार महिन्यांनंतर याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. या टोळीतील सहा जणांपैकी तीन जणांना पोलिसांनी अटक केली. यामुळे फसवणुकीचे आणखी काही प्रकार उघडकीस येण्याची शक्यता आहे.
अमोल विश्वनाथ महाजन (३०) हा आईवडिलांसह पातोंड्यात राहतो. िमस्तरी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतो. त्याच्या विवाहासाठी गावातीलच किरण नारायण पाटील, एजंट याने औरंगाबाद येथील ओळखीच्या एका मुलीशी परिचय करून दिला. मुलाच्या वडिलास मुलगी पसंत पडल्यानंतर १ लाख ७० हजार रुपयांत व्यवहार ठरून लग्नाची तारीख २५ जानेवारी निश्चित केली. ठरल्याप्रमाणे २५ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता अमोल, त्याचे वडील विश्वनाथ महाजन, एजंट किरण पाटील, अमोलचे नातेवाईक व मुलीकडील सुरेखा गणेश भावणे, शकुंतला शिवाजी वंजारे, शुभम प्रशांत कीर्तीशाही यांच्यासोबत एक मुलगी असे सर्वजण एका वाहनात आले. यावेळी अमोलच्या वडिलांनी नवरी मुलगी सोनिया राम कळसकर हिचे नाव, गाव विचारले. त्यानंतर पातोंड्यात अमोल व सोनिया कळसकर यांचा विवाह झाला. लग्नात सोनिया हिला २ ग्रॅम वजनाच्या कानातील रिंग व २ ग्रॅम वजनाची सोन्याची मंगल पोत असे दागिने दिले. लग्न आटोपल्यानंतर ठरल्याप्रमाणे १ लाख ७० हजार रुपयांची रोकड घेऊन सुरेखा भावणे, शकुंतला वंजारे, किरण पाटील हे त्यांच्या घरी निघून गेले. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी किरण पाटील, शंकुतला वंजारे, शुभम कीर्तीशाही या तिघांना अटक केली.
लुटणाऱ्या टोळीच्या रॅकेटमध्ये औरंगाबादच्या आरोपींचा समावेश
चार दिवसांत नवरी पसार
लग्न होऊन चार दिवस होत नाही तोच २९ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता कथित नवरी सोनिया हिची आई ज्योती कळसकर ही पातोंडा येथे आली. नवस असल्याने मुलगी सोनिया हिला माहेरी घेऊन जात असल्याचे अमोलच्या आईला सांगितले. यावेळी एजंट किरण पाटील, सुरेखा भावणे, शकुंतला वंजारे यांनी मध्यस्थी करून सोनिया हिला माहेरी जाऊू द्या, ती स्वत: परत येईल असे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून सोनिया हिला तिच्या आईसोबत माहेरी पाठवले. त्यानंतर मात्र सोनिया ही सासरी पातोंडा येथे परतलीच नाही. आज, उद्या येईल म्हणून वाट पाहिली. मध्यस्थी लोकांना फोन करून घटना सांगितली असता त्यांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली.
नवरदेवाच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा
खोटे लग्न लावून फसवणूक केल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर अमोल महाजन याने पोलिस ठाणे गाठले. २५ ते २९ जानेवारी दरम्यान संशयित सुरेखा भावणे, शंकुतला वंजारे (दोन्ही रा. औरंगाबाद), एजंट किरण पाटील, ज्योती कळसकर व शुभम कीर्तीशाही यांनी संगनमताने कट रचून अमोल महाजनचा विश्वास संपादन करून त्याचे लग्न सोनियाशी लावून देण्याचा बनाव करून लग्न लावण्यासाठी १ लाख ७० हजार रुपये रोख व २५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केल्याची तक्रार दिली. त्यानुसार संबंधित सहा जणांविरोधात येथील ग्रामीण पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पाेलिस या रॅकेटच्या सूत्रधाराचाही शाेध घेत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.