आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ व खान्देशची कुलस्वामिनी म्हणून ओळख असलेल्या पाटणादेवी (चंडीका देवी) मंदिर तसेच धवल तीर्थ धबधबा तसेच केदार कुंड या परिसरात १० ऑगस्टपर्यंत भाविकांसह पर्यटकांना प्रवेशबंदी केली आहे. मात्र, पाटणा ग्रामस्थांनी या निर्णयाला विरोध करुन धवल तीर्थ धबधबा व केदार कुंड परिसर बंद ठेवा, मात्र पाटणा देवी मंदिर भाविकांसाठी खुले करा, अशी मागणी केली आहे. बुधवारी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी मंदिर खुले करण्याबाबत तहसील कार्यालयात धडक देत तहसीलदारांना पत्र दिले.
जिल्हाधिकारी यांनी २१ जुलैला पाटणादेवी अभयारण्यातील केदार कुंड व धवल तीर्थ धबधबा येथे जाण्यास पर्यटकांना बंदी केली आहे. हा आदेश ग्रामस्थांना मान्य आहे. मात्र, या परिसरात चंडिका मातेचे पुरातन मंदिर असून मातेच्या दर्शनासाठी देशातून भाविक येतात. परंतु, चंडिका माता मंदिर अभयारण्यात येत असल्याने तेथे अनेक जाचक बंधने भाविकांवर घातले जातात. पाटणा देवी मंदिरापासून ३ किमी अंतरावर अभयारण्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. तर जिल्हा प्रशासनाने प्रवेश बंदी केलेले धवल तीर्थ हे मंदिरापासून दीड तर केदार कुंड हे अडीच किमी अंतरावर आहे. त्यामुळे मंदिर परिसरात कुठल्याही प्रकारच्या आपत्ती व्यवस्थापनाचा धोका नाही. तर पाटणा देवी मंदिर सुरक्षित असून जिल्हा प्रशासनाने मंदिर प्रवेश बंदी केलेली नाही.
अद्यापही पूल नाहीच
पाटणा देवी मंदिराबाहेर डोंगरी नदीवर असलेल्या लोंखडी पुलाचा मोबदला पुरातत्व विभागाने संबधित कंत्राटदाराला न दिल्याने हा लोखंडी पूल जून महिन्यात काढून घेतला आहे. पूल नसल्याने मंदिरात जाणाऱ्या भाविकांना व पर्यटकांना दर्शनासाठी जीव धोक्यात घालून नदीच्या पाण्यातून जावे लागते. आमदार मंगेश चव्हाण यांनी या नदीवर तत्काळ पूल उभारण्याबाबत आदेश केले हाेते. या नंतरही येथे पूल उभारला नसल्याने मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या पुरातत्त्व विभागाच्या कारभाराबाबत संताप व्यक्त होत होता.
दर्शनासाठी जाऊ द्यावे
अभयारण्याचे मुख्य प्रवेशद्वार बंद असल्याने भाविकांना मंदिर परिसरात जाता येत नाही. परिणामी बाहेरून आलेले भाविक पाटणा देवीचे दर्शन न झाल्याने नाराज होतात. त्यामुळे भाविकांना अभयारण्याचे मुख्य प्रवेशद्वार खुले करून मंदिर दर्शनासाठी जावू द्यावे, अशी विनंती पाटणा ग्रामपंचायतीने एका निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर सरपंच नितीन चौधरी, सदस्य महेंद्र निकम, सागर निकम, आबासाहेब सोनवणे, तुषार धात्रक, सोमनाथ मोरे, संजय खुटे, समाधान चौधरी, आबा पाटील, भगवान चौधरी, राजू मोरे, सोमेश चौधरी, राजेंद्र वाघ, आनंदा सोनवणे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.