आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे स्टेशन:गुन्हेगार रेल्वे स्टेशनवर येताच वाजतो अलार्म; 32 गुन्हेगारांना पकडले

श्रीकांत सराफ | भुसावळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेल्वे स्थानकांवरील गुन्हेगारी राेखण्यासाठी विमानतळांच्या धर्तीवर रेल्वे मंत्रालयाने, फेसियल रिकग्निशन साॅफ्टवेअरचा आधार घेतला आहे. जंक्शनवर लावलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यांच्या साॅफ्टवेअरमध्ये गुन्हेगारांचे फाेटाे अपलाेड केले आहेत. आरपीएफच्या यादीवरील गुन्हेगार या कॅमेऱ्यांच्या नजरेत आल्यास, तात्काळ आरपीएफ नियंत्रण कक्षातील अलार्म वाजतो. या यंत्रणेच्या माध्यमातून आरपीएफने गेल्या आठ महिन्यात ३२ गुन्हेगारांना अटक केली आहे. प्रायाेगिक तत्वावर भुसावळ आणि मनमाड स्थानकावर ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे.

रेल्वे बाेर्डाकडून स्थानकांवरील आणि धावत्या गाड्यांमधील सुरक्षेवर अधिक भर दिला जात आहे. यासाठी नवनवीन उपकरणांचा उपयाेग केला जात आहे. मध्य रेल्वेतील महत्वपूर्ण स्थानक असलेल्या भुसावळातही सुरक्षेच्या उपाययोजना कठोर केल्या आहेत. रेल्वेचे जंक्शन असल्याने भुसावळ स्थानकावर चाेऱ्यांचे प्रकार वाढत आहेत. याला पायबंद घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाने जंक्शनवर १५० सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. यासाठी स्वतंत्र कंट्राेल रूम तयार केले आहे. रेल्वे जंक्शनवर येणारे-जाणारे प्रवासी व आऊटरपर्यंत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे गुन्हेगरांवर नजर ठेवली जाते. जंक्शनचे दाेन्ही प्रवेशद्वार, सर्व दहा प्लॅटफाॅर्म, यार्ड, आऊटर या परिसरावर कॅमेऱ्यांद्वारे आरपीएफची नजर असते. मात्र सीसीटीव्हीपेक्षाही आधुनिक तंत्रज्ञानाचा आता वापर केला जात आहे.

बेवारस वस्तूचीही मिळते माहिती
रेल्वे प्रशासनाकडून फेसियल रिकग्नीशन साॅफ्टवेअरचा वापर केला जात आहे. या साॅफ्टवेअरमध्ये आरपीएफकडे असलेल्या गुन्हेगारांचे फाेटो अपलाेड केला जातो. जर गुन्हेगार रेल्वे स्थानकावरील सीसीटिव्ही कॅमेऱ्यात आला तर आरपीएफला त्वरित अलार्मद्वारे त्याची माहिती मिळते. तसेच सीसीटीव्हीत दिसणाऱ्या गुन्हेगाराभोवती वर्तुळ निर्माण होते. तसेच स्थानकावर तासभर एखादी वस्तू बेवारस पडलेली आढळल्यास, या साॅफ्टवेअरच्या माध्यमातून आरपीएफला सूचना मिळते.

बातम्या आणखी आहेत...