आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आनंदसरी:चोपडा, एरंडोल, धरणगावात बरसल्या आनंदसरी ; आज पावसाच्या आगमनामुळे शेतकरी राजा सुखावला

धरणगाव20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चोपडा तालुक्यातील गोरगावले मंडळात दमदार पावसाने हजेरी लावली होती आणि त्याच ठिकाणी आज वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. आज पुन्हा ११ रोजी तालुक्यातील अनेक भागात संततधार पावसाने हजेरी लावली. आजच्या पावसाने कापूस व केळी तसेच इतर पिकांना मोठा लाभ होणार असून आज पावसाच्या आगमनामुळे शेतकरी राजा सुखावला आहे. प्रचंड ऊन आणि वाढत्या तापमानाने जनता हैराण झाली होती. परंतु, आजच्या पावसामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, गोरगावले मंडळात ९ रोजी झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी आज अमळनेरच्या प्रांताधिकारी सीमा अहिरे, चोपडा तहसीलदार अनिल गावित यांनी नुकसानग्रस्त भागात भेट देत नुकसानीची पाहणी केली. या वेळी नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते. पाहणी-नंतर तहसीलदार अनिल गावित यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले की, सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. तीन ते चार दिवसात सर्व पंचनामे झाल्यानंतर ज्या केळी उत्पादक शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला आहे. त्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ व्हावा, यासाठी पुढील मार्गदर्शनासाठी पीक विम्याच्या अधिकाऱ्यांना बोलावून तहसील कार्यालयात बैठक बोलावणार आहे. दरम्यान, आज झालेल्या पावसामुळे चोपडा, एरंडोल, धरणगाव येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

प्रांताधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्यांची मागणी प्रांत सीमा अहिरे आणि तहसीलदार अनिल गावित गोरगावले बुद्रुक येथे आल्यानंतर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी केळी विम्याच्या नुकसानीची प्रत आम्हाला मिळावी, अशी मागणी केली. दरम्यान, ‘दिव्य मराठी’च्या वृत्तानंतर अधिकारी आमच्या गावात पोहाेचले आहेत. सातत्याने ‘दिव्य मराठी’ने प्रत्येक वेळी संकटात आम्हाला मोठी साथ दिल्याची भावना आज माजी ग्रामपंचायत सदस्य जीवन पाटील, स्वप्नील महाजन आदी शेतकऱ्यांनी या वेळी व्यक्त केली.

शहरासह परिसरात ११ जून रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. गेल्या आठवड्यापासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आज झालेल्या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. परिणामी परिसरात गारवा निर्माण झाला हाेता. सायंकाळी ६ वाजेपासून पुन्हा तुरळक पावसाने सुरुवात झाली आहे. परिसरातील बळीराजा मात्र मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. तालुक्यांमध्ये जवळपास ७० ते ८० टक्के शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. परंतु एका चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आता शेतकरी दिसत आहेत.

एरंडोल शहरात आतापर्यंत पाऊस झालेला नव्हता, परंतु ११ जून रोजी सायंकाळी ६.४० वाजता तुरळक प्रमाणात पहिल्या पावसाने हजेरी लावली. पहिला पाऊस आला खरा परंतु अत्यल्प प्रमाणात. केवळ ५ ते १० मिनिटे एरंडाेल शहरात पावसाने तुरळक प्रमाणात हजेरी लावली. पाऊस सुरू झाल्याने लहान मुले पहिल्या पावसाच्या सरींचा आनंद घेताना दिसून आले. दरम्यान, पाऊस सुरू होताच नेहमीप्रमाणे शहरातील काही भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता.

बातम्या आणखी आहेत...