आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेश भक्तांसाठी योग्य नियोजन:शांतता समितीच्या बैठकीत ऑनलाइन नोंदणीचे गणेश मंडळांना आवाहन

चाळीसगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामाजिक सलोखा राखून मोठ्या उत्साहात, खेळीमेळीच्या वातावरणात व शासकीय नियमांचे पालन करून गणेश उत्सव साजरा करण्याचे आवाहन अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे व पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांनी उपस्थित गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना केले. येथील पोलिस ठाण्याच्या आवारात २५ रोजी सायंकाळी ६ वाजता शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली होती. अध्यक्षस्थानी अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे होते. या वेळी व्यासपीठावर तहसीलदार अमोल मोरे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, पोलिस निरीक्षक के. के. पाटील, पीआय सचिन कापडणीस, पीआय विशाल टकले, वीज वितरणचे अभियंता नरेंद्र राऊत, शहर वाहतूक शाखेचे देवरे आदी उपस्थित होते.

गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा हाेत असून यात सर्व समाजबांधव सहभागी होतात. त्यामुळे गणेश भक्तांसाठी योग्य नियोजन करावे, सामाजिक सलोख्यात बाधा येणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच गणेशोत्सव काळात कोणत्याही मंडळाने जुगार खेळू नये, तसे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल. तर शासनाचे नियम व अटींचे पालन करून सण शांततेने साजरा करण्याचे आवाहन अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांनी केले. याप्रसंगी तहसीलदार अमोल मोरे म्हणाले की, निवडणूक आयोगातर्फे उत्कृष्ट गणेश मंडळांना ५१ हजार, २१ हजार व ११ हजार असे बक्षीस तर घरगुती गणेश मंडळाच्या आरासला ११ हजार, ७ हजार व ५ हजारांचे बक्षीस देण्यात येणार आहे. यात गणेश मंडळांनी सहभाग घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले. पोलिस निरीक्षक के. के. पाटील, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, नगरसेवक रामचंद्र जाधव, आण्णा कोळी यांनी गणेशाेवातील शासनाच्या निर्बंधांबाबत मार्गदर्शन केले. बैठकीला शहरातील विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, नगरसेवक, पालिकेचे कर्मचारी, वीज वितरणचे कर्मचारी, ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.

बातम्या आणखी आहेत...