आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तोंडापूर परिसरात अस्वलाचा संचार:बिबट्याने डरकाळी फोडताच मजूर महिलांनी काढला पळ; फत्तेपूर-गोद्री रोडवरील घटना

जामनेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

फत्तेपूर येथील शेतमजूर महिला सकाळी ८ वाजेदरम्यान कामासाठी गोद्रीकडे जात होत्या. यावेळी कांग नदीकडून किन्ही शिवाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या बिबट्याने डरकाळी फोडताच मजूर महिलांची त्रेधा उडाली. शुक्रवारी सकाळी घडलेल्या या प्रकाराने परिसरातील शेतकरी धास्तावले आहेत. तर शनिवारी तोंडापूर परिसरातील जंगलात अस्वल असल्याचे काहींना दिसून आले.

नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी ८ वाजेदरम्यान फत्तेपूर येथील मजूर महिला गोद्री शिवारातील शेतांमध्ये कामासाठी जात होत्या. याचवेळी फत्तेपूर ते गोद्री रस्त्याच्या मधोमध असलेल्या जुन्या पाण्याच्या टाकीपासून तर किन्ही शिवाराकडे डांबरी रोडवरून एक बिबट्या रस्ता ओलांडून जात असल्याचे काही महिलांना दिसले. महिलांना पाहून बिबट्याने डरकाळी फोडताच महिला फत्तेपूरकडे धावत आल्याची माहिती शेतकऱ्याने दिली. याबाबत शेतकऱ्यांनी माहिती देताच वन विभागाचे कर्मचारी प्रल्हाद काळे व शब्बीर पिंजारी यांनी घटनास्थळ गाठले. मात्र, तोपर्यंत बिबट्या निघून गेलेला होता.

अस्वलाचे दर्शन
शनिवारी सकाळी तोंडापूर शिवारातील शेतीला लागून असलेल्या अजिंठा पर्वत रांगेच्या भागात काही शेतकऱ्यांना अस्वल दिसले. शेतकऱ्यांनी त्याचे फोटो काढून ते वन विभागाचे कर्मचारी प्यारेलाल महाजन यांना टाकले. महाजन यांनी घटनास्थळी जाऊन शेतकऱ्यांना याेग्य सूचना केल्या.

सुरक्षित जागेच्या शोधात
फत्तेपूर परिसरात बिबट्या असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे तत्काळ कर्मचारी प्रल्हाद काळे व शब्बीर पिंजारी हे घटनास्थळी गेले. मात्र, तोपर्यंत बिबट्या निघून गेला होता. त्यानंतर शनिवारी तोंडापूर परिसरात अस्वल असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. हा अस्वल मादा असून प्रजनन काळ असल्याने ती सुरक्षीत जागेच्या शोधात असावी, असे मत वनपाल प्यारेलाल महाजन यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...