आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधुळे-सोलापूर या महामार्गावरील कन्नड घाट वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. दोन वर्षांपुर्वी घाटात अतिवृष्टीमुळे दरडी कोसळल्याने घाटातील रस्ता खचला होता. तसेच संरक्षक कठड्यांचे नुकसान झाले होते. त्यामुळे दुरुस्तीसाठी घाट काही दिवस बंद होता. मात्र, डागडुजीनंतर घाटातील रस्ता गुळगुळीत झाला आहे. त्यामुळे वाहतुकीची समस्या सुटली असली, तरी वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. त्यातही दर शनिवारी आणि रविवारी ही समस्या अधिक वाढते.
सुमारे चार कोटी रुपये खर्च करून घाटाची डागडुजी झाली. त्यानंतरही घाटातील वाहतुकीचा खोळंबा होण्याचे प्रकार थांबले नाहीत. डागडुजीनंतर घाटातील वाहतुक सुरळीत होईल अशी अपेक्षा असताना घाटात, दर दोन दिवसांआड वाहतुकीचा खोळंबा होतच असतो. त्यामुळे वाहनधारकांचा वेळ वाया जातो. नाशवंत मालाची हानी होते. पर्यायी मार्गच नसल्याने वाहनधारकांचा नाईलाजाने कोंडीचा धोका पत्करून घाटाचा मार्ग निवडावा लागतो. दुरुस्तीसाठी घाटातील वाहतूक बंद असताना, वाहने नांदगाव-वैजापूर, शिऊर बंगलामार्गे वळविण्यात आली होती.
आता मात्र घाटातील रस्त्याचे काम उत्तम झाले असले, तरी वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे घाटातील प्रवास वाहनधारकांना नकोसा झाला आहे. दर दोन दिवसांआड घाटात तासन््तास वाहतूक ठप्प होते. त्यामुळे अनेक किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. विशेष म्हणजे सकाळी व सायंकाळी तसेच रात्री उशिरा घाटात कोंडी झाल्यास कित्येक तास वाहनांना एकाच जागी सक्तीचा थांबा घ्यावा लागतो. दुरुस्तीनंतर घाटातील रस्ता चकचकीत झाला असला, तरी कोंडीची समस्या सुटलेली नाही.
रस्त्याचे रुंदीकरण व्हावे
कन्नड घाटात वाहतुकीचा खोळंबा टाळण्यासाठी रस्त्याचे रुंदीकरण आवश्यक आहे. काही वर्षांपासून घाटातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी बोगद्याचा पर्याय पुढे आला होता. मात्र, प्रचंड खर्चामुळे तो पर्याय मागे पडला. आता घाटातील रस्त्याच्या रूंदीकरणाचा घाट घातला जात आहे. लवकरच घाटाच्या रुंदीकरणाबाबत निविदा निघतील असे सांगितले जात होते. प्रत्यक्षात याबाबत कोणत्याही हालचाली नाहीत. घाटात सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत, केवळ कोंडीची समस्या वाढली आहे.
घाटातील फलक, रिफ्लेक्टर यांची पाहणी केली जाणार
घाटाचे विस्तारीकरण व बोगदा या संदर्भात अजून कुठलेही नियोजन माझ्यापर्यंत नाही. रिफ्लेकटर व दिशादर्शक फलकांची पाहणी करण्यात येईल तसेच वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहनधारकांनी वाहनात पुरेसे डिझेल ठेऊन आपले वाहन सुस्थितीत आहे की नाही हे पाहणे तसेच घाटात शिस्त देखील पाळावी. वाहतूक कोंडी झाली तर त्याठिकाणी क्रेन व मदतकार्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध असते. - रविंद्र इंगोले, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
समस्येवरील उपाय : फिटनेस प्रमाणपत्रातील अटी पूर्ण करणाऱ्या वाहनांनाच घाटात प्रवेश द्यावा. घाटात वेगमर्यादेचा नियम अत्यंत कठोरपणे पाळावा, त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, मार्गदर्शक फलक, रिफ्लेक्टर नवीन बसावावे.
कोंडीची करणे : घाटात अनेकदा अवजड वाहनांचे ब्रेक फेल होतात. घाटातून जाताना कार, दुचाकीसारखे लहान वाहनधारक लेनची शिस्त पाळत नाहीत. त्यामुळे ओव्हरटेकच्या प्रयत्नात दोन मोठ्या वाहनांमधून लहान वाहने काढताना वाहतूक कोंडी होतेे.
रिफ्लेक्टर, दिशादर्शक फलक निरुपयोगी
कन्नड घाट हा एकूण १४ किमीचा आहे. घाटातील रस्ता वळणावळणाचा असल्याने अनेक ठिकाणी रिफ्लेक्टर व दिशादर्शक फलक लावले आहेत. मात्र, या फलकांची स्थिती अतिशय वाईट झाली आहे. अनेक ठिकाणी धोक्याचा इशारा देणारे फलकच नाहीत. त्यामुळे नवख्या वाहनचालकांकडून चूक होण्याची भीती असते. त्यामुळे अनेकदा वाहने दरीत कोसळून गंभीर अपघातही होतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.