आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देहदान:धरणगावात शुक्ला कुटुंबातील तिसऱ्या सदस्याचेहीदेहदान; तिन्ही भावांनी समाजासमोर ठेवला आदर्श

धरणगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील मदन शंकर शुक्ला (वय ७९) यांचे २६ मे रोजी सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचा देह डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास दान करण्यात आला. यापुर्वी त्यांच्या दोन भावांनीही देहदान केले होते हे विशेष. सुमारे आठ ते दहा पिढ्यांपासून धरणगाव शहरात स्थायिक झालेल्या शुक्ला कुटुंबातील मागील पिढीतील शेवटचे सदस्य मदन शंकर शुक्ला (वय ७९) यांचे २६ मे रोजी सायंकाळी निधन झाले.

त्यांच्या खिशात आढळलेल्या चिठ्ठीवरून त्यांच्या देहदानाच्या संकल्पाची कुटुंबियांना माहिती मिळाली. मृत्यूनंतर आपले पार्थिव शरीर डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला दान करण्याची शपथ घेतली असून, मृत्यूनंतरही वैद्यकीय शिक्षणासाठी शरीर संरचनाशास्त्र विभागाला शरीर दान करावे, असा मजकूर त्यांनी चिठ्ठीत लिहून ठेवला होता. त्यामुळे कुटुंबियांनी वेळ न दवडता त्यांच्या इच्छेनुसार मृतदेह डॉ.उल्हास पाटील रुग्णालय व महाविद्यालयात पाठवला. शुक्ला कुटुंबातून देहदान करणारे मदन शुक्ला हे तिसरे व्यक्ती ठरले.

यापुर्वी त्यांच्या दोन्ही भावांनी मरणोत्तर देहदान केले होते. धरणगाव येथील शुक्ला कुटुंबातील तिन्ही भावांनी केलेल्या देहदानाच्या कार्यामुळे, समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. स्व.मदन शुक्ला हे धरणगाव येथील कान्यकुब्ज ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष आणि पत्रकार विजयकुमार शुक्ला यांचे काका होते. शुक्ला बंधू यांच्या कार्यामुळे समाजात देहदानाविषयी जनजागृती घडून आली आहे. त्यामुळे शहरासह परिसरात या चळवळीला अधिक बळ मिळेल, अशा आशावाद व्यक्त केला जात आहे.

यापूर्वी दोन्ही भावांनी केले होते देहदान
सर्वप्रथम या कुटुंबातील लहान भाऊ तथा जळगावातील ला.ना.विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक कै.रमेश शंकर शुक्ला, यांनी २००५ मध्ये निवृत्त झाल्यानंतर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या तत्कालीन उपकुलगुरूंना पत्र लिहून देहदानाचा संकल्प व्यक्त केला होता. तसेच मृत्यूनंतर कोणताही धार्मिक विधी करण्यास त्यांनी मनाई केली होती. २७ एप्रिल २०१८ रोजी त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलांनी संकल्प पूर्ण केला. तसेच कोणतेही धार्मिक विधी केले नाही. त्यानंतर त्यांचे ज्येष्ठ बंधू कै.मनोहर शंकर शुक्ला (रा.भुसावळ) यांनीही देहदान केले होते.
मनोहर शुक्ला
मदन शुक्ला