आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हल्ला:वाघडू येथे रानडुकराचा महिलेवर जबर हल्ला; रानडुकरांचा बंदोबस्त करावा, ग्रामस्थांची मागणी

चाळीसगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील वाघडू येथील महिला घराच्या पाठीमागे झाडाखाली बसलेली असताना त्यांच्यावर रानडुकराने हल्ला केल्याची घटना दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे वाघडू गावासह परिसरातील नागरिकांकडून वन्य प्राण्यांचा बंदाेबस्त करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

वाघडू येथील सरलाबाई संजय पाटील (वय ४२) ही महिला घरामागील झाडाखाली अन्य तीन ते चार महिलांसह बसल्या होत्या. दुपारी १ वाजेच्या सुमारास घरामागील शेतातून अचानक रानडुकराने सरलाबाई यांच्यावर हल्ला केला. यात डुकराने सरलाबाई यांच्या मानेचा लचका तोडला. इतर महिलांनी आरडाओरडा केल्याने रानडुक्कर गावातील गल्लीतून पळून गेले. दरम्यान, सरलाबाई यांना उपचारासाठी चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

यात सरलाबाई यांना ११ टाके पडले असून कानाला ही दात लागल्याने गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान, दिवसेंदिवस शेतशिवारातही रानडुकरांचा हैदोस वाढत आहे. यातच सध्या शेती कामे सुरु असल्याने नागरिकांमधून भीती व्यक्त केली जात आहे. वन विभागाने तातडीने रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.