आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:विधवा वहिनीशी लग्न करून तरुणाने समाजासमोर ठेवला आदर्श

जामनेरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

चुलत भावाचे अपघाती निधन झाल्यानंतर विधवा वहिनीला सात जन्माची साथ देण्याचे वचन देत, ओझर (ता.जामनेर) येथील युवकाने विधवा चुलत वहिनीशी विवाह केला. मध्यप्रदेशातील इच्छापूर येथे येथे हा आगळावेगळा विवाह २२ रोजी पार पडला.

ओझर येथील अनिल एकनाथ महाजन हे पुणे येथील बँकेत व्यवस्थापक होते. गेल्यावर्षी जून महिन्यात कार अपघातात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे त्यांच्या पत्नी प्रियंका महाजन व त्यांची दोन महिन्यांची बालिका असा दोघांचा आधार हरपला होता. प्रियंका यांच्या व त्यांच्या बालिकेच्या भवितव्याची चिंता महाजन परिवाराला सतावत होती. अखेर कचरुलाल बोहरा यांनी पुढाकार घेत महाजन कुटुंबियांना प्रियंका यांच्या पुनर्विवाहासाठी राजी केले.

प्रियंका यांचा दीर शुभम सुरेश महाजन याच्याकडे विवाहाचा प्रस्ताव देण्यात आला. त्यानेही लागलीच होकार दिला. त्यानंतर महाजन परिवारातील सर्वांना विश्वासात घेऊन प्रियंकाच्या माहेरीही चर्चा करण्यात आली. चर्चेअंती दोघांचा विवाह ठरला. त्यामुळे २२ रोजी मध्यप्रदेशातील इच्छापूर येथील इच्छादेवीच्या मंदिरात हा विवाह संपन्न झाला. या विवाहासाठी पुढाकार घेणारे कचरूलाल बोहरा यांनी कन्यादान केले. बाळू पाटील, विकास महाजन, नथ्थू चौधरी, विनोद काळबैले, जावेद मुल्लाजी, जितू महाजन यांनी परिश्रम घेतले.

भावानेच लावले नोकरीला अनिल महाजन यांनी हयात असताना आपल्या गावातील व भावकीतील अनेक तरुणांना बँकिंग क्षेत्रात नोकरीला लावले होते. शुभम महाजन यालादेखील अनिल यांनीच बँकेत नोकरी लावून दिली होती. त्यामुळे मृत भावाच्या या उपकाराची परतफेड करण्याची हीच वेळ असल्याची भावना शुभमने बोलून दाखवली. तसेच प्रियंका यांची मुलगी पाच वर्षांची झाल्यानंतर तिचा सांभाळ करण्याची जबाबदारी स्व. अनिल महाजन यांच्या आई-वडीलांनी घेतली आहे.