आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण:चाळीसगाव, अमळनेरात प्रत्येकी दोन ग्रा.पं. झाल्या बिनविरोध, आजपासून प्रचारास प्रारंभ

चाळीसगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमुळे वातावरण तापले आहे. चाळीसगावात १६ तर अमळनेरात २४ ग्रामपंचायतींचे चित्र बुधवारी स्पष्ट झाले. चाळीसगावातील डामरुण व अंधारी, तर अमळनेरात अंतुर्ली-रंजाणे व चोपडाई ग्रा.पं.बिनविरोध झाल्या आहेत.

चाळीसगावात उंबरखेड, मेहुणबारे ग्रामपंचायतीत होणार चुरशीची लढत निवडणूक होऊ घातलेल्या तालुक्यातील १६पैकी डामरूण व अंधारी या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. तर उंबरखेड, मेहुणबारे व दरेगाव या मोठ्या गावांसह १४ गावांमध्ये निवडणूक रंगणार आहे. माघारी नंतर आता सरपंच पदाच्या १४ जागांसाठी ४७, तसेच सदस्य पदासाठी ३११ असे एकूण ३५८ उमेदवार रिंगणात आहेत. सरपंच पदासाठी ७ गावांमध्ये दुरंगी तर उर्वरीत गावांमध्ये तिरंगी ते बहुरंगी लढती आहेत.

सरपंच पदासाठी उंबरखेडला तिरंगी तर मेहुणबारेत ६ उमेदवार मैदानात आहेत. खासदार उन्मेष पाटील यांचे मूळ गाव दरेगावातही सरपंच पदासाठी ३ उमेदवार रिंगणात आहेत. छाननीअंती सरपंच पदासाठी ९६ तर सदस्य पदासाठी ४९७ उमेदवारी अर्ज शिल्लक होते. माघारीच्या २ दिवसात २३४ उमेदवारांनी माघार घेतली.

अमळनेरात कोंढावळ येथे सर्व सदस्य बिनविरोध, सरपंच पदाचीच निवडणूक माघारीच्या अखेरच्या दिवशी तालुक्यातील अंतुर्ली-रंजाणे व चोपडाई या दोन ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली. सरपंचांसह सदस्य बिनविरोध निवडून आले. तर कोंढावळ येथे सर्व सदस्य बिनविरोध झाले आहेत. फक्त सरपंच पदासाठी एकास एक सरळ लढत आहे.

चोपडाई येथे भटू मधुकर भिल (सरपंच) तर सदस्य म्हणून देविदास शंकर गायकवाड, द्रौपदाबाई भास्कर पाटील, वैशाली ज्ञानेश्वर पाटील, विठ्ठल देविदास पाटील, अहिल्याबाई ज्ञानेश्वर पाटील, भगवान देवराम रखमे, आशाबाई नाना सैंदाणे हे ११ उमेदवार बिनविरोध निवडून आले. तर अंतुर्ली -रंजाणे ग्रामपंचायतीत मंगलाबाई किशोर पाटील बिनविरोध सरपंच झाल्या. तर सदस्य पदासाठी बापू उत्तम ठाकूर, संजय नारायण सैंदाने, सीमा भरत पाटील, सागर मधुकर जगदेव, निशा राहुल पाटील, हेमांगी पवन पाटील, उज्वला पिंटू भिल हे बिनविरोध झाले. जानवे येथे सरपंच पदासाठी तिरंगी तर १३ सदस्यांसाठी एकास एक सरळ लढत आहे. ६ जणांनी माघार घेतली आहे. जैतपिर येथे दोन पॅनल मध्ये एकास एक सरळ लढत आहे. ८ जणांनी माघार घेतली आहे. खापरखेडा येथे ३ सदस्य बिनविरोध झाले, सरपंचपदासाठी चौरंगी लढत तर उर्वरित ४ जागांसाठी ८ जण रिंगणात आहेत. मारवड येथे १३ जणांनी माघार घेतली, २ सदस्य बिनविरोध आहेत ९जागांसाठी२२ जण तर सरपंच पदासाठी एकास एक लढत आहेत.

बातम्या आणखी आहेत...