आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइयत्ता बारावी अर्थात एचएससी परीक्षेचा निकाल बुधवारी दुपारी १ वाजता आॅनलाइन पद्धतीने जाहीर झाला. यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली. चाळीसगाव तालुक्याचा ९५.२९ टक्के लागला आहे. तालुक्याची निकालाची टक्केवारी मात्र गत वर्षाच्या तुलनेने घसरली आहे. सन २०२१च्या तुलनेत यंदाचा निकाल ५ टक्क्यांनी घटला असून सन २०२०च्या तुलनेत मात्र १० टक्क्यांनी वाढला आहे. मेडिकल, सीए, आयटीसह स्पर्धा परीक्षेकडे जाण्याची इच्छा उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. चाळीसगाव तालुक्यातून बारावी परीक्षेसाठी बसलेल्या ४ हजार ५०४ नियमित विद्यार्थ्यांपैकी ४ हजार २९२ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ९५.२९ टक्के इतका निकाल लागला. १०० विद्यार्थ्यांनी पूर्नपरिक्षा दिली हाेती. यात ६५ विद्यार्थीच उत्तीर्ण झाले. त्यांचा ६५ टक्के निकाल लागला. तालुक्यात २ हजार ७०६ मुले तर १ हजार ७९८ मुली परीक्षेस बसल्या होत्या. त्यातील २ हजार ५४१ मुले तर १ हजार ७५१ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९३.९० टक्के तर मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९७.३८ टक्के आहे. चांगले गुण मिळवून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर यशाचे समाधान झळकले. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वांकडून तोंडभरून कौतुक केले जात होते. यंदा ऑनलाइन अभ्यासक्रम शिकलेल्या विद्यार्थ्यांनी ऑफलाइन परीक्षा दिल्याने, विद्यार्थ्यांसह पालकांच्याही मनात परीक्षेविषयी धाकधूक होती. मात्र, परीक्षेच्या काळात वाढवून दिलेला वेळ, घटवण्यात आलेला अभ्यासक्रम यामुळे विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण हलका झाला.
गतवर्षापेक्षा निकालात यंदा पाच टक्क्यांनी घट चाळीसगाव तालुक्याचा २०२० या वर्षात बारावीचा निकाल ८६.९७ टक्के लागला होता. कमी निकाल लागून निकालाची टक्केवारीही घसरली होती. त्यानंतर २०२१मध्ये कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. बारावीचे अंतर्गत मूल्यमापन तसेच दहावी आणि अकरावीच्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आला होता. तेव्हा २ हजार १९९ मुले तर १ हजार ५७६ मुली उत्तीर्ण होवून मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९९.६८ टक्के तर मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९९.३६ टक्के िनघाले. तालुक्याचा १०० टक्के निकाल लागला. सन २०२१च्या तुलनेत यंदाचा निकाल ५ टक्क्यांनी घटला असून ९५.२९ टक्के निकाल लागला. तर २०२०च्या तुलनेत १० टक्क्यांनी वाढला. यंदाच्या निकालातही मुलींनी स्वत:ला पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
अमळनेरात नऊ शाळांचा निकाल शंभर टक्के दहिवद येथील नवभारत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय, जानवे येथील किसान माध्यमिक विद्यालय, अमळनेरातील अल्फाईज उर्दू ज्युनियर कॉलेज, मारवड येथील स्वर्गीय भालेराव पाटील ज्युनियर कॉलेज, देवगाव- देवळीची श्री साई ज्युनियर कॉलेज, गडखांब येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मांडळ येथील आदर्श हायस्कूल, विजय नाना आर्मी स्कूल, मुडी येथील गुरुकुल इंग्लिश स्कूल या ९ शाळांचा १०० टक्के निकाल लागला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.