आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील सहा जिल्हा परिषद गटांमधील लढती अत्यंत चुरशीच्या होणार आहेत. लासूर-घोडगाव व चुंचाळे-अकुलखेडा हे दोन गट महिला राखीव झाल्याने, माजी जि.प.सदस्य भाजपचे गजेंद्र सोनवणे व सेनेचे हरीष पाटील यांना आता उमेदवारी करता येणार नाही. तर लासूर-घोडगाव गटात नव्याने जिल्हा बँकेच्या माजी व्हाइस चेअरमन इंदिराताई पाटील किंवा त्यांच्या स्नुषा या राष्ट्रवादीकडून लढू शकतात. चुंचाळे-अकुलखेडा गटात हातेडचे माजी सरपंच मनोज सनेर हे खासदार रक्षा खडसे याचे कट्टर समर्थक असून ते आपल्या पत्नीसाठी उमेदवारी मागू शकतात. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार स्व.राजाराम बाबुराव पाटील हे फक्त ७१ मतांनी पराभूत झाले होते. तर गजेंद्र सोनवणे हे भाजपकडून विजयी झाले होते. त्यामुळे गजेंद्र सोनवणे व मनोज सनेर हे आपल्या कुटुंबातील महिला उमेदवार देऊ शकतात. तसेच माजी सभापती प्रा.भरत जाधव हेदेखील आपल्या कुटुंबातील महिला उमेदवारासाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी आणू शकतात.
अडावद धानोरा गटात काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी केली आणि नंतर भाजपच्या सहकार्याने ज्यांना आरोग्य सभापती पद मिळाले, असे दिलीप युवराज पाटील हे आगामी निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी करतील. दोडे गुर्जर संस्थानचे अध्यक्ष चंद्रशेखर पाटील हे माजी आरोग्य सभापती दिलीप पाटील यांचे बंधू आहेत. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने आता पुन्हा दिलीप पाटील हे अडावद-धानोरा गटातून भाजपकडून भवितव्य आजमावतील. तसेच वर्डी-गोरगावले गटातून माजी महिला बालकल्याण सभापती, भाजपच्या ज्योती राकेश पाटील यांना उमेदवारी मिळेल, अशी अधिक शक्यता आहे. त्यांना आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी व सेनेतील शिंदे गटाचा सामना करावा लागेल. गेल्या निवडणुकीत ज्योती पाटील अल्प मतांनी विजयी झाल्या होत्या. निर्जला कांतीलाल पाटील यांनी सेनेकडून त्यांना तगडे आव्हान दिले होते. नागलवाडी-विरवाडे गटात गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपचे आत्माराम म्हाळके यांच्या नियोजनामुळे एकतर्फी निवडणूक उज्वला म्हाळके यांनी जिंकली होती.
आता हा गट सर्वसाधारण जागेसाठी आरक्षित असून, या गटातून भाजपकडून आत्माराम म्हाळके हेच उमेदवार राहण्याची शक्यता आहे. काही महिन्यांपूर्वी सेनेचे माजी आमदार कैलास पाटील व भाजपमधून माजी केंद्रीय समिती सदस्य असलेले जिल्हा बँकेचे संचालक घनश्याम अग्रवाल, इंदिराताई पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने, घड्याळाची ताकद वाढली आहे.
चहार्डी-कुरवेल गटात उत्सुकता
चहार्डी-बुधगाव ऐवजी हा गट आता चहार्डी-कुरवेल झाला आहे. या गटात ओबीसी महिला राखीव आरक्षण आहे. या गटात गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत मीना अशोक पाटील व मनीषा अशोक चौधरी या दोन्ही उमेदवारांनी सेना व भाजपकडून उमेदवारी केली होती. त्यावेळी राष्ट्रवादीकडून नीलम पाटील या विजयी झाल्या होत्या. त्यामुळे आता पुन्हा एकदा या गटात चुरस पाहायला मिळणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.